-कुटुंबातील बाप-लेक गंभीर जखमी, उद्यमनगर-शेटय़ेनगरमधील घटना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरालगतच्या शेटय़ेनगर येथे एका फ्लॅटमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने शहर परिसर हादरून गेला. या स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की, शहरातील 5 ते 6 किलोमीटर अंतरापर्यंत त्याचा आवाज घुमल़ा बुधवारी पहाटे घडलेल्या या भीषण घटनेत एकाच कुटुंबातील माय-लेकी जागीच गतप्राण झाल्य़ा तर बाप आणि मुलगा गंभीर जखमी झाल़े हा स्फोट प्राथमिक अंदाजानुसार, सिलिंडरमधील लिकेज गॅसमुळे झाल्याचा कयास वर्तवण्यात येत आहे., पण स्फोटाची तीव्रता लक्षात घेता नेमका कशामुळे झाला असावा, या बाबत तर्कवितर्कांना उधाण आले आह़े
कनिज अश्फाक काझी (48, ऱा शेटय़ेनगर रत्नागिरी) व नुरूनीसा अल्जी (70, ऱा मजगांव रत्नागिरी) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत़ तर अश्फाक अहमद काझी (52) व अमार अश्फाक काझी (20, ऱा शेटय़ेनगर मुळ ऱा सोमेश्वर-रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत़ स्फोटात 72 टक्क्यांहून अधिक होरपळून जखमी झालेल्या अश्फाक याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आह़े

बटणाचा खटका उडताच झाला मोठा धमाका
उद्यमनगर परिसरातील शेटय़ेनगर हा भाग दाटीवाटीच्या चाळीचा आह़े या भागात अश्फाक काझी यांचे कुटुंबिय ‘आशियाना’ गृहसंकुलात एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास होत़े अश्फाक हे एक रिक्षा व्यावसायिक आहेत़ बुधवारी रात्री हे सर्व हॉलमध्ये झोपी गेले होत़े बुधवारी पहाटेच्या सुमारास अश्फाक हे नेहमीप्रमाणे लवकर उठल़े त्यांनी मंगळवारी सकाळी पहाटे 4.56 मिनिटांनी किचनमध्ये जावून लाईट लावण्यासाठी बटण दाबले आणि आक्रितच घडल़े बटणाचा खटका पडताच काही कळण्याच्या आतच भीषण धमाका झाल़ा
प्रचंड धमाक्याने घराची वाताहात, स्लॅबही कोसळला
झालेला धमाका इतका प्रचंड होता की, अश्फाक हे जागच्या जागीच सुन्न पडल़े घराची तर अक्षरशः वाताहात उडाल़ी प्रचंड स्फोटाने घराच्या इमारतीचा स्लॅब देखील तुटून पडल़ा भिंतीच्याही ठिकऱया उडाल्य़ा स्फोटाच्या दणक्याने मजबूत भिंतीचे बांधकाम तुटून गेल़े त्या बांधकामाचे चिरे शेजारी राहणाऱया रहिवाशांच्या इमारतींवर जावून पडल़े
आगीचा डोम उसळला अन् शेजारीपाजारीही हादरले
अश्फाक यांच्या घरात झालेल्या भीषण स्फोटाने लगतच्या शेजाऱयांनाही मोठा हादरा बसल़ा पहाटेच्या सुमारास साखरझोपेत असणारे शेजारीही खाडकन् उठल़े लागोलाग स्फोटाच्या आवाजामुळे घराबाहेर पडल़े त्यावेळेस अश्फाक यांच्या घरातून उठलेला आगडोंब पाहून अनेकांची बोबडी वळल़ी तर काहींची पाचावर धारण झाल़ी आग आटोक्यात आणण्यासाठी लागोलाग फोन खणाणू लागल़े कुणी अग्निशमन बंबाला तर कुणी पोलिसांना घटनेच्या माहितीसाठी धावाधाव करू लागल़े
अश्फाक यांचे कुटुंबिय ढिगाऱयाखाली अडकले
प्रचंड धमाक्यामुळे अश्फाक यांच्या घराची मोठी पडझड झाली होत़ी त्यामुळे त्यांचे कुटुंबिय तुटून पडलेल्या स्लॅबच्या ढिगाऱयाखाली अडकून पडले होत़े घटनेनंतर मदतीसाठी उपस्थित साऱयांची मोठी धावाधाव सुरू झाल़ी मोठय़ा शर्थीने ढिगाऱयाखाली असलेल्या अश्फाक यांच्या कुटुंबियाना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात आल़ी
‘वाचवा…वाचवा’च्या आर्त किंकाळ्य़ांनी सारे हेलावले
अश्फाक यांच्या घराचा स्लॅब कोसळल्यामुळे त्या खाली त्यांची पत्नी कनिज व सासू नुरूनीसा या अडकून पडल्या होत्य़ा कनिज मदतीसाठी वाचवा…वाचवा अशा आर्त किंकाळ्य़ा फोडत होत्य़ा पण अवजड स्लॅबखालून त्यांना बाहेर काढणे मोठय़ा जिकिरीचे काम होत़े स्लॅब उचलणे क्रेनशिवाय शक्य नव्हत़े तोपर्यंत या मदतकार्यात मोठा विलंब झाला होत़ा
वीज गेल्यामुळे पहाटे बचावकार्यात अडथळा
घटना घडली आणि या परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला होत़ा यामुळे मदतकार्यात गुंतलेल्या सर्वासमोर प्रश्न उभा राहिला काय करावे, या विवंचनेत सारे पडले होत़े बॅटऱयांच्या प्रकाशझोतात हे मदतकार्य सुरूच राहिले होत़े पण त्यावेळी ढिगाऱयाखाली अडकून पडलेल्या कुटुंबियांना वेळीच मदत करण्यात अडथळा निर्माण झाला होत़ा
अग्निशमन दल, क्रेन, रूग्णवाहिकांना येण्यास विलंब
भीषण स्फोटाची घटना घडल्यानंतर मदतीसाठी स्थानिक रहिवाशांकडून खबर देण्यात आली होत़ी मात्र जितक्या लवकर मदतयंत्रणा पोहोचणे अपेक्षित होत़े त्यापेक्षा काहीसा येण्यास विलंब झाल़ा ही घटना 4.56 च्या सुमारास घडलेली असताना अग्निशमन दल 5.35 वाजता घटनास्थळी पोहोचल़े रूग्णवाहिका 5.45 वाजता घटनास्थळी दाखल झाल़ी तर क्रेन 7 च्या सुमारास घटनास्थळी पोहचल़ी त्यामुळे मदतकार्यातही मोठा विलंब झाल़ा









