पहिल्या दोन तिमाहीत आली कमी बिले; जपून पाणी वापरल्याचा परिणाम
देवदास मुळे/ कराड
शहरात चोवीस तास पाणी योजना कार्यान्वित झाली नसली तरी गेल्या एप्रिल महिन्यापासून मीटरपद्धतीने पाणी बिलांची आकारणी होत आहे. प्रत्येक तिमाहीला एक बिल दिले जात असून आतापर्यंत दोन बिले देण्यात आली आहे. यात बिले वाढल्याच्या तक्रारी येत असून त्यावरून गदारोळ सुरू असला तरी सहा महिन्यातील दोन बिलांमध्ये सुमारे 5 हजार नळकनेक्शन धारकांना सरासरी बिले कमी आली असून हे नागरिक भलतेच खुश आहेत.
शहरात गेल्या एप्रिल 2022 पासून मीटरपद्धतीने पाणी बिलांची आकारणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक तिमाहीचे एक बिल दिले जात आहे. आतापर्यंत एप्रिल ते जून व जुलै ते सप्टेंबर या दोन तिमाहींची बिले नागरिकांना देण्यात आली आहेत. मीटर पद्धतीने आकरणी होण्यापूर्वी सरसकट वार्षिक पाणी बिलाची आकारणी होत होती. त्यावेळी पाणी योजनेचा तोटा कमी करण्यासाठी दरवर्षी 60 रूपये पाणीपट्टीत वाढ होत होती. त्यामुळे 31 मार्च 2022 पर्यंत घरगुती कनेक्शनला वार्षिक 2 हजार रूपये पाणीपट्टी आकारली जात होती. व्यावसायिकसाठी त्यापेक्षा जास्त पाणीपट्टी होती.
गेल्या सहा महिन्यात देण्यात आलेल्या पाणी बिलांची पडताळणी केली असता शहरात निम्या कनेक्शनधारकांना आलेली बिले वार्षिक 2 हजार रूपये पाणी बिलांपेक्षा कमी येणार असल्याचे दिसत आहे. वार्षिक 2 हजार रूपये पाणीपट्टी घरगुती कनेक्शनला आकारण्यात येत होती. त्याप्रमाणे प्रत्येकी 3 महिन्याची पाहणी 500 रूपये इतकी होते. मीटर पद्धतीने आकारलेल्या बिलांची पडताळणी केली असता एप्रिल ते जून 2022 या पहिल्या तिमाहीत शहरातील 4 हजार 937 कनेक्शनधारकांना आलेली बिले 500 रूपयांच्या आत आली आहेत. यात 50 रूपयांपासून 500 रूपयांपर्यंत बिले आहेत. तर जुलै ते सप्टेंबर 2022 या दुसऱया तिमाहीत 4 हजार 904 नागरिकांना आलेली बिले 500 रूपयांपेक्षा कमी आहेत. दोन्ही बिलांची टक्केवारी एकूण बिलांच्या अनुक्रमे 44.53 टक्के व 44.23 टक्के इतकी आहे. या बिलांमध्ये घरगुती व व्यावसायिक अशा दोन्ही वर्गातील कनेक्शनधारकांचा समावेश आहे. आजपर्यंत सरसकट वार्षिक बिल आकारणीत आपल्याकडून नगरपालिकेने जादा पैसे घेतले असल्याची भावना या कनेक्शनधारकांमध्ये निर्माण झाली आहे.
एप्रिल महिन्यापासून मीटरपद्धतीने बिलाची आकारणी सुरू करण्यात आली. तेव्हापासून पालिकेच्या घंटागाडय़ांच्या माध्यमातून पाण्याचा वापर काटकसरीने करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तरीही शहरात सुमारे 50 टक्के कनेक्शनधारकांना पहिल्या दोन तिमाहीत आलेली बिले वाढून आल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत आहेत. पहिल्या तिमाहीत 501 ते 1000 पर्यंत बिले आलेल्या नागरिकांची संख्या 3217 (29.02 टक्के) इतकी आहे. तर 1001 ते 2000 रूपयांपर्यंत बिल आलेल्या नागरिकांची संख्या 2265 (20.43 टक्के) आहे. तर पहिल्याच तिमाहीत 5001 रूपयांपेक्षा जास्त बिल आलेल्यांची संख्या 90 (0.81 टक्के) आहे. दुसऱया तिमाहीत हे प्रमाण जवळजवळ सारखे राहिल्याचे दिसत आहे.
पाणीपट्टीच्या आकारणीचे घरगुती, संस्था, व्यावसायिक असे प्रकार आहेत. यात घरगुती ग्राहकांना बिल कमी आले असले तरी व्यावसायिक बिले, संस्थांची भरमसाठ वाढल्याच्या तक्रारी आहेत. अजूनही नागरिकांमध्ये जागृती पुरेशा प्रमाणात झाली नसल्याचे दिसत आहे. पाण्याचा अफाट वापर कमी करण्यात आला तर बिले अजूनही कमी प्रमाणात येण्याचीही शक्यता आहे.
पाणी वापर कमी झाल्यानंतर चोवीस तास पाणी शक्य
चोवीस तास पाणी योजनेची चाचणी घेताना पालिकेने सोमवार पेठ व वाखाण भागातील टाकीवरून चोवीस तास पाणी पुरवठा सुरू केला होता. मात्र घराघरातील नळ सुरूच राहिल्याने टाक्यांमधील पाणी पुरले नव्हते. गरजेपुरता वापर करण्यापेक्षा पाण्याचा साठा करणे, अन्य कारणांसाठी पाण्याचा वापर करणे व अन्य कारणांमुळे त्यावेळी चोवीस तास पाणी देणे शक्य झाले नव्हते. पाणी वापर कमी झाला तरच चोवीस तास पाणी देणे शक्य होणार असल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात येत आहे.
पाणी बिलांचा ठराव नगरसेवकांचा; तोंडाला प्रशासन
चोवीस तास पाणी योजनेसाठी मीटरच्या प्रमाणे बिल आकारणीचा ठराव गेल्या पंचवार्षिकमध्ये झाला होता. त्यावेळी पहिल्या 10 हजार लीटरला 8 रूपये प्रति हजारी, 20 हजार लीटरपर्यंत 9 रूपये प्रति हजारी व त्यापुढे 10 रूपये प्रति हजारी याप्रमाणे बिल आकारणीचा ठराव पालिकेच्या विशेष सभेत नगरसेवकांनी मंजुरी दिली होती. त्याची अंमलबजावणी प्रशासक राजवटीत पालिका प्रशासन करत असून नागरिकांच्या भडिमाराला प्रशासनाला तेंड द्यावे लागत आहे. मीटर पद्धतीने बिल आकारणीतील त्रुटी दूर करण्याचे आव्हान पाणीपुरवठा विभागासमोर आहे.








