नेक्सॉन होणार 50,000 रुपयांनी स्वस्त
नवी दिल्ली
टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही नेक्सॉन ईव्हीच्या किमती कमी केल्या आहेत. यामध्ये बेस ट्रिमच्या किमतीत जवळपास 50,000 रुपयांची कपात झाली आहे. 14.99 लाख रुपये (सर्व किंमती एक्स-शोरूम) वरून 14.49 लाखांवर किंमत आली असल्याची माहिती आहे.
त्याचवेळी, नेक्सॉन ईव्ही मॅक्समध्ये एक नवीन प्रकार एक्सएमदेखील जोडला गेला आहे. त्याची किंमत 16.49 लाख रुपये आहे. नेक्सॉन ईव्हीच्या लाँचला 3 वर्षे पूर्ण झाल्यामुळे किमती कमी करण्यात आल्या आहेत. महिंद्राने नवीन पूर्णपणे इलेक्ट्रिक एक्सयूव्ही400 ची किंमत जाहीर केल्याच्या एका दिवसानंतर कंपनीचा निर्णय आला आहे. बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 15.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, जी 18.99 लाख रुपयांपर्यंत जाते. या किमती पहिल्या 5000 ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. ही महिंद्रा एसयूव्ही टाटा नेक्सॉन ईव्हीशी स्पर्धा करते. सिंगल चार्जमध्ये 456 किमी धावणार असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.
नेक्सॉन ईव्ही दोन प्रकारामध्ये
नेक्सॉन ईव्ही दोन प्रकारांमध्ये (प्राइम आणि मॅक्स) येते आणि वेगवेगळ्या चार्जिंग पर्यायांसह येते. नवीन किंमत अपडेटसह, ईव्ही प्राइम (बेस मॉडेल) ची प्रारंभिक किंमत 14.49 लाख रुपये झाली आहे आणि नेक्सॉन ईव्ही मॅक्सची उच्च आवृत्ती 16.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. संपूर्ण नेक्सॉन ईव्ही लाईन-अपसाठी बुकिंग सुरु करण्यात आले आहे. नेक्सॉन ईव्ही मॅक्स एक्सएम या नवीन प्रकाराची डिलिव्हरी एप्रिल 2023 पासून सुरू होणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.









