ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जन्मदर वाढविण्यासाठी सिक्कीम सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनी दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यास त्यांना दुप्पट वेतनवाढ देण्याची घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमाम यांनी केली आहे.
देशात एकीकडे जन्मदर कमी करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची मागणी होत असतानाच सिक्कीम राज्य लोकसंख्या वाढवण्यासाठी राज्यातील महिलांना प्रोत्साहन देत आहे. सिक्कीमची लोकसंख्या 7 लाखांपेक्षा कमी आहे. सिक्कीमच्या जन्मदरात घट होणे चिंतेचा विषय असल्याने सिक्कीम सरकारने जन्मदर वाढविण्यासाठी महिलांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या महिलांनी जर दुसऱ्या बाळाला जन्म दिला तर त्यांना दुप्पट वेतनवाढ देण्यात येणार आहे. जर महिलेने तिसऱ्या अपत्यास जन्म दिल्यास त्यावर महिलेला आणखी इतर सुविधा देण्यात येणार आहेत. फक्त सरकारी महिला कर्मचारीच नाही तर बाळाला जन्म देणाऱ्या सर्वसामान्य महिलांनाही सरकार मदत करणार आहे.
महिलेला बाळ होण्यासाठी वैद्यकीय अडचणी येत असतील तर सरकार IVF सेंटर तयार करून दवाखान्यासाठी 3 लाख रुपये खर्च करणार आहे. दरम्यान, यापूर्वी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाच्या नेतृत्वाखाली असलेल्या कॅबिनेटने 14 नोव्हेंबर 2021 रोजी आई होणाऱ्या सरकारी महिलेला बाळंतपणासाठी 365 दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली आहे. तर बाळाच्या वडिलांना 30 दिवसांची सरकारी पितृत्व सुट्टी सरकारने दिली आहे.