प्रतिनिधी /पणजी
गोवा सरकार राज्यातील सर्व जोखमीच्या उद्योगांचा आढावा घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल सभागृहात दिली. यापुढे अशा प्रकारच्या उद्योगांना निवासी वस्तीजवळ परवानगी दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले. पिळर्ण बर्जर पेंट फॅक्टरीला लागलेली आग आणि कुंकळी इंडस्ट्रियल इस्टेटमधील दुर्घटनांचा हवाला देत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाओ यांनी उच्च जोखमीच्या उद्योगांचा उल्लेख टाइम बॉम्ब म्हणून केला.
आगीच्या घटनांचा अभ्यास करून 15 दिवसांत अहवाल सादर करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती सावंत यांनी दिली. समितीने अहवाल दिल्यानंतर योग्य ती कार्यवाही सुरू केली जाईल. गरज पडल्यास कारखान्याला दंड ठोठावण्यात येईल, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
कळंगुटचे आमदार मायकल लोबो लक्षवेदी सुचाना करताना त्यांनी पळर्ण येथील बर्जर पेंट कंपनीचा विषय मांडला होता. मोठ्या प्रमाणात ज्वलनशील द्रव आणि इतर रसायने वापरणारा कारखाना रहिवासी क्षेत्राच्या अगदी जवळ असल्याने तो स्थलांतरित करावा, असे आवाहन मायकल लोबो यांनी केले. ज्या ठिकाणी आगीची घटना घडली त्या ठिकाणच्या जवळपास लोक वस्ती आहे, तसेच सुमारे 150 खोल्याचे हॉटेल आहे. फक्टरीला लागलेली आग आजही पुन्हा पेटत होती. त्यामुळे आग लागण्याची घटना पुन्हा कधीही होऊ शकते. एकूणच ही फॅक्टरी म्हणजे त्या भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका बनली असल्याने ती स्तलांतरीत करावी असेही मायकल लोबो म्हणाले. आमदार केदार नाईक यांनी समयोजित विचार मांडला.
इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागली, एकदाच नव्हे तर याच फॅक्टरीत आग लाग लागण्याची ही दुसरी घटना आहे. आगीत मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. मात्र कोणतीच जीवीत हानी झालेली नाही, एकूणच हा संशयास्पत प्रकार आहे. कंपनीची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.
आगीच्या घटनेमुळे पळर्ण परीसरात मोठ्या प्रमाणात प्रदुषण झाले आहे. तेथील विहीरींचे पाणीही दुषीत झाले आहे. एकूणच सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असताना सत्ताधारी पक्षातील एकही मंत्री कंपनीच्या विरोधात बोलत नाही याचाच अर्थ सरकारचे कंपनीशी लागेबांधे आहेत की काय असा संशय निर्माण होत असल्याचे सरदेसाई म्हणाले.
दुर्घटनेच्या वेळी अग्निशामक दलाने चांगली कामगिरी बजावली मात्र अग्निशामक दलाकडे पाहिजे तशी उपकरणे नसल्याने त्यांनाही मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले. सरकारची यंत्रणे बोथड बनली असून सरकार पूर्णपणे अपयशी ठरत आहे. अशी टीका करताना, सरकारने याकडे गांभीर्याने पहाणे गरजेचे आहे. असा सल्लाही दिला. अशा प्रकारच्या घटना कधीही घडू शकतात त्यासाठी प्रत्येक कंपनीतील आग आणि सुरक्षा बाबत नियमित तपासणी होते का असा प्रश्न विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला.
आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी कंपनीच्या विरोधात गुन्हा नोंद करून सार्वजनिक मालमत्तेचे झालेल्या नुकसानीची भरपाई करून घ्यावी अशी मागणी केली आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्या नंतर धावपळ करण्यापेक्ष ती दुर्घटना होणार नाही यासाठी तजवीज करणे महत्वाचे आहे. कॉँग्रेसचे आमदार कर्लूस पेरेरा यांनी सांगितले. गोव्यात अनेक ठिकाणी रस्ते अऊंद आहेत. मोठमोठ्या फॅक्टरी असलेल्या ठिकाणीही अऊंद रस्ते आहेत. एखाद्यावेळी दुर्घटना घडली की त्या ठिकाणी अग्निशामक दलाची मोठी वाहने घटनास्थळी पोचणे कठीण असते. त्यासाठी गोवा सरकारने अग्निशामक दलासाठी किमान दोन हॅलीकॅप्टर घ्यावी अशी मागणी आमदार ऊदाल्फ फर्नांडिस यांनी केली आहे.









