विजय सरदेसाई यांचा आरोप : राज्यपालांच्या अभिभाषणातून म्हादईचा विषय डावलला, जनतेत असंतोष, विरोधी आमदारांची सरकारवर टीका
प्रतिनिधी /पणजी
राज्यपालांच्या अभिभाषणातून म्हादईचा विषय डावलण्यात आला आणि त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सावंत सरकारने एक प्रकारे ही जनतेची फसवणूक व दिशाभूल केल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी राज्य विधानसभेत ठणकावून सांगितले. राज्यपालांनी देखील म्हादईकडे डोळेझाक केल्यामुळे जनतेत असंतोष असल्याचे सरदेसाई यांनी निदर्शनास आणले आणि राज्यपालांचे भाषण म्हणजे फक्त थापेबाजी असल्याचा आरोप केला. अनेक घोटाळेबाज प्रकल्पांबाबत राज्यपालांच्या भाषणात काहीच उल्लेख नसल्याबद्दल सरदेसाई यांनी आश्यर्च व्यक्त केले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन ठरावास सरदेसाई यांनी विरोध दर्शवून भाषणातून राज्यपालांनी केलेले दावे चुकीचे असल्याचे दाखवून दिले. सावंत यांचे सरकार म्हणजे ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ सरकार असल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणाले राज्यपालांचे भाषण हे सरकारी असते. राज्य सरकार ते लिहून देते आणि राज्यपाल वाचून दाखवतात. तामिळनाडूच्या राज्यपालांनी सरकारी भाषण न वाचता स्वत:चे वेगळे भाषण केले तसे गोव्यात का होऊ शकत नाही ? सवाल सरदेसाई यांनी उपस्थित केला. वर्तमानपत्रांनी देखील राज्यपालांच्या भाषणात म्हादईवर काहीच भूमिक नसल्याबद्दल खंत व्यक्त केल्याचे निदर्शनास आणले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, कला अकादमी दुरुस्ती प्रकल्प, खाण महामंडळ, जेटी धोरण, कर्मचारी भरती आयोग याबाबत राज्यपालांच्या भाषणात काहीच नाही. याचे कारण काय ? अशी विचारणा सरदेसाई यांनी केली. कोणताही विचार न करता राज्य सरकार केंद्राची मार्गदर्शक तत्वे आंधळेपणाने पुढे रेटते त्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील, असा इशारा सरदेसाई यांनी दिला. मोपा विमानतळावरील अनेक प्रश्न ऐरणीवर असून त्यावर तोडगा नसल्यामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.
काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी मोपा विमानतळाचे प्रश्न उपस्थित केले. इंटरनेट नाही, पिण्यासाठी पाणी नाही, वाहतुकीची सोय नाही, विमानतळाचे नावही अर्धवट, ते मनोहर पर्रीकर विमानतळ करण्याची ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी गोव्यात दिली होती, परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाने पर्रीकर नाव वगळून फक्त मनोहर या नावावरच शिक्कामोर्तब केल्याचे फेरेरा यांनी नमूद केले.
सर्वश्री आलेक्स सिक्वेरा, क्रूझ सिल्वा, अल्हास तुयेकर, कृष्णा साळकर, डिलायला लोबो, व्हॅन्सी व्हिएगश, आंतोन वाझ, जेनिफर मोन्सेरात यांची राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन ठरावावर भाषणे झाली. सत्ताधारी आमदारांनी सरकारची राज्यपालांची स्तुती केली तर विरोधी आमदारांनी भाषणातील तसेच सरकारच्या त्रुटींवर बोट ठेवून टीका केली.









