महापालिकेचा प्रायोगिक तत्त्वावर शिवाजी उद्यान-बाबू जगजीवनराम उद्यानात प्रकल्प
प्रतिनिधी /बेळगाव
उद्यानांच्या सुशोभिकरणासाठी विविध प्रकारची झाडे लावली जातात. मात्र, या झाडांचा पालापाचोळा पडून उद्यानात कचरा निर्माण होतो. हा कचरा तुरमुरी कचरा डेपोत टाकला जातो. मात्र, यापुढे हा कचरा तुरमुरी कचरा डेपोत टाकण्याऐवजी उद्यानातच त्यावर प्रक्रिया करून खत निर्माण करण्याचा प्रकल्प महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केला आहे.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्यादृष्टीने महापालिकेकडून विविध उपक्रम राबविले जातात. मात्र, स्वच्छतेच्या नियोजनाला शिस्त लागत नाही. विविध उद्यानांत निर्माण झालेल्या कचऱ्याला आग लावली जाते. किंवा हा कचरा तुरमुरी डेपोत पाठविला जातो. प्रत्येक उद्यानात सावली व सुशोभिकरणासाठी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे झाडांच्या पानांचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. हा कचरा तुरमुरी डेपोत टाकण्याऐवजी स्थानिक पातळीवर जमा करून त्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करण्याचा उपक्रम महापालिकेने हाती घेतला आहे.
सध्या प्रायोगिक तत्त्वावर शिवाजी उद्यान आणि बाबू जगजीवनराम उद्यानात पालापाचोळ्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या उद्यानांमध्ये जमा होणारा कचरा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या हौदात टाकण्याची सूचना स्वच्छता कामगारांना करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक व विघटन न होणारा कचरा टाकू नये, अशी सूचना केली आहे. फलोत्पादन खात्याच्या सहकार्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने हा उपक्रम उद्यानांमध्ये राबविला आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या खत निर्मिती प्रकल्पात उत्पादन होणारे खत उद्यानातील झाडांना वापरण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आली आहे.









