वृत्तसंस्था/ दुबई
येथे सुरू असलेल्या इंटरनॅशनल लिग टी-20 स्पर्धेत दुबई कॅपिटल्स आणि गल्फ जायंटस् यांच्यातील झालेल्या सामन्यात भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने आक्रमक खेळी केली. दुबई कॅपिटल्स संघाकडून खेळताना उथप्पाने 46 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारासह 79 धावा झळकवल्या पण गल्फ जायंटस्ने या सामन्यात दुबई कॅपिटल्सचा 6 गडय़ांनी पराभव केला.
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गल्फ जायंटस्चा कर्णधार जेम्स व्हिन्सने 65 धावा झळकवल्या होत्या. तर या दुसऱया सामन्यात व्हिन्सने नाबाद 83 धावा जमवत आपल्या संघाला 6 चेंडू बाकी ठेऊन 4 गडय़ांनी विजय मिळवून दिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दुबई कॅपिटल्सने 20 षटकात 8 बाद 182 धावा झळकवल्या. त्यानंतर गल्फ जायंटस्ने 19 षटकात 4 बाद 183 धावा जमवत हा सामना जिंकला. कर्णधार व्हिन्सने 58 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारासह नाबाद 83 धावा जमवताना इरासमूससमवेत तिसऱया गडय़ासाठी 107 धावांची भागीदारी केली. इरासमूसने 28 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह 52 धावा झळकवल्या.









