प्रतिनिधी /फोंडा
म्हादई नदीसाठी गोव्यातून उभारण्यात आलेल्या लढ्याला फोंडा मुस्लीम संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे. कर्नाटकला दिलेला डीपीआर केंद्र सरकारने त्वरीत मागे घ्यावा अशी मागणी करणारे लेखी निवेदन संघटनेतर्फे पंतप्रधानाना पाठविण्यात आले आहे. तसेच या निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री व दक्षिण आणि उत्तर गोव्याच्या खासदारांना सादर केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सज्जाद मुल्ला यांनी दिली.
नागामशीद-कुर्टी येथील नुरानी मशीदजवळ घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे सचिव अल्ताफ शेख, सदस्य मुल्ला मुनाफ, सैय्यद जब्बर, मुल्ला इस्माईल, शब्बीर मुल्ला, मुस्ताक शेख, फिरोज खान, जावेद मुल्ला आदी उपस्थित होते. म्हादई नदीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी संघटीतपणे लढा द्यायला हवा. गोव्यातील मुस्लीम बांधवांचा म्हादईच्या रक्षणासाठी सदैव पाठिंबा राहणार असून गोव्याच्या भावी पिढीसाठी म्हादई टिकून राहणे गरजेचे आहे, असे सज्जाद मुल्ला यांनी सांगतिले.









