कृषीमंत्री रवी नाईक यांचे गौरवोद्गार सुवर्णमयी वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार
प्रतिनिधी /कुंभारजुवे
आजचे सत्कारमूर्ती राज भिकारो नाईक हे अत्यंत कष्टपूर्वक प्रवासातून पुढे आलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची लेखनशैली सडेतोड, सुस्पष्ट, सत्यदर्शक आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी आपली लेखणी तळागाळातील गोम्ंातकीयांसाठी वापरली आणि त्यामुळे गोव्याच्या कानाकोपऱ्यात त्यांचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे, त्यांचा प्रामाणिकपणा आणि सुसंवादी स्वभावामुळे सर्वांना ते आपले वाटतात, असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कृषीमंत्री रवी नाईक यांनी काढले.
मळार – ओल्ड गोवा येथील श्री वनदेवी मुकोबा मंदिरात जेष्ठ पत्रकार, साहित्यिक, नाटककार, मुलाखतकार राजू भिकारो नाईक यांच्या सुर्वणमहोत्सवी वर्षप्रित्यर्थ सत्कार समितीतर्फे आयोजित सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून कृषीमंत्री रवी नाईक बोलत होते.
व्यासपीठावर सन्माननीय अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ सोमनाथ कोमरपंत, दै. तरुण भारतचे गोवा आवृत्ती संपादक सागर जावडेकर, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष तथा सत्कार सोहळा समितीचे कार्याध्यक्ष रमेश वंसकर, ज्येष्ठ शिक्षक तथा सहकारश्री किसन फडते, श्री वनदेवी मुकोबा मंदिराचे अध्यक्ष निळकंठ भोमकर, सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष प्रकाश तळावडेकर, सत्कार सत्कारमूर्ती राजू नाईक, सौ. कविता राजू नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वत:च्या क्षमतेवर घडविली कारकीर्द : जावडेकर
राजू नाईक हे अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक तसेच संवेदनशील मनाचे सकारात्मक विचार करणारे व्यक्तीमत्व आहे. ते महाविद्यालयात असतानाच तरुण भारतच्या कॉलेज विश्व पुरवणीसाठी प्रतिनिधी म्हणून लिहितानाच त्यांचे गुण आम्ही पारखले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते उपसंपादक म्हणून रूजू झाले. त्यांची निवड ही कोणा वशिल्यावरुन नव्हे, तर त्यांच्या स्वत:च्या क्षमतेवरुन झाली होती आणि पुढे त्यांनी ती सिद्ध करुन दाखविली, असे जावडेकर म्हणाले.
म्हादईसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज
म्हादईच्या विषयावर त्यांनी त्याकाळी लेखन केले आणि त्याबद्दल त्यांना गोवा युनियन ऑफ जर्नलिस्टचा प्रतिष्ठेचा पुरस्कारही मिळला. म्हादई हा गोव्याच्या अस्तित्वाचा प्रŽ आहे. राजकीय हेवेदावे विसरून सर्वानी म्हादईसाठी एकत्र येऊन लढण्याची नितांत गरज आहे, असे आवाहन जावडेकर यांनी केले.
राजू नाईक हे आमच्या गावचे भूषण : भोमकर
राजू नाईक हे भूमुपत्र असून आमच्या गावचे ते भूषण आहे. त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाचा सत्कार त्यांच्या मातोश्री लक्ष्मीआई यांच्या समोर सत्कार होतोय ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना सरकारी उच्च पदाची नोकरी मिळाली असती परंतु त्यांनी पत्रकारितेच्या धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेऊन स्वताच्या नावलौकिकाबरोबर आमच्या गावांचेही नाव सर्वदूर नेले आहे. प्रत्येक गावात शाळा, आरोग्य केंद्र आणि राजू यांच्यासारखा प्रामाणिक, निगर्वी पत्रकार असावा, असे उदगार नीळकंठ भोमकर यांनी काढले.
घराचा, गावचा नावलौकिक वाढविला : कोमरपंत
राजू नाईक हे माझे मित्र म्हणून मला अभिमान आहे. त्यांनी पहिल्या इंनिगमध्ये पत्रकारिता व साहित्यिक क्षेत्र ढवळून काढले आहे. राजूनी शोध पत्रकारितेद्वारे संपूर्ण गोव्याचे लक्ष वेधून घेतले. परिपूर्णतेसाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. कसदार लेखनामुळे ते नाटककार, कवि, लेखक म्हणून गाजत आहेत. त्यांनी आपल्या कार्यातून घराण्याचा, गावच्या नावलौकिकात समिधा टाकल्या आहेत. त्यांनी आपला ज्ञानमय वारसा उर्वरित आयुष्यात चालुच ठेवावा, डॉ सोमनाथ कोमरपंत म्हणाले.
राजू नाईक यांच्यावर गौरवग्रंथ काढावा : फडते
राजू नाईक हे उत्कृष्ट मुलाखतकार असून त्यांनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय नामवंत व्यक्तीमत्वांच्या घेतलेल्या मुलाखती यादगार ठरल्या आहेत. देवभक्ती, वाचन, मनन, आवश्यक तो प्रवास, पारंपरिकतेबरोबरच आधुनिकतेचाही ते सजगपणे स्वीकार करत असल्याचे आपण पाहिले आहे. सत्कार समितीने यापुढे त्यांचा सविस्तर असा गौरवग्रंथ काढावा, अशी सूचना किसन फडते यांनी केली.
सत्काराला उत्तर देताना सत्कार नाईक यांनी आपल्या जीवनपट सर्वांना उलघडवून सांगितला. प्राथमिक शिक्षणापासून एम.ए. पर्यंतच्या शिक्षण प्रवास सांगून ज्यांनी मदत केली त्यांचा प्रामाणिक उल्लेख केला. ब्रिगेडिय, शिक्षक अन् पत्रकारही होण्याचे स्वप्न पाहिले. पत्रकारिते संधी प्रथम मिळाली आणि पुढे त्यातच मार्गक्रमण करुन इथपर्यंत पोहोचलो. राजकारणात 96 टक्क राजयोग आहे, पण तिथे थांबलो नाही. आपल्याला हवा दिसत नाही, तरीही ती असल्याचे आपण शंभर टक्के मानतो त्याचप्रमाणात आपल्या अवतीभवती देव शंभर टक्के आहे, ही आपली अनुभूती आहे. देव, देश अन् धर्मासाठी जे काही करणे शक्य आहे, ते करत आल्यामुळे आनंदमय जीवन जगू शकलो, अशी प्रांजळ कबुली नाईक यांनी दिली.
मान्यवरांचे जयवंत आडपईकर, हेमंत खांडेपारकर, चेतना फायदे, सुहास बेळेकर, भक्ती नितीन माशेलकर, दिपाली मंगेश नाईक, देतेशा मंगेश नाईक, रेशमी मंगेश नाईक उत्तम रेडकर, यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी कृषी मंत्री रवी नाईक यांच्या हस्ते राजू नाईक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, समई, मानपत्र, व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सौ. कविता. राजू नाईक यांची सौ. लेखा लक्ष्मीकांत नाईक यांनी ओटी भरली. सुहास बेळेकर यांच्या हस्ते राजूंच्या मातोश्री श्रीमती लक्ष्मी भिकारो नाईक यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आली. सत्कार समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ कवि प्रकाश तळावडेकर यांनी मान्यवरांना स्मृतिचिन्हे भेट दिली. संपूर्ण कार्यक्रमो सूत्रसंचालन व मानपत्राचे वाचन राजमोहन शेटये यांनी सुंदरपणे केले. ज्येष्ठ साहित्यिक रमेश वसंकर यांनी स्वागत व प्रास्ताविक तर विठ्ठल गावंस यांनी आभार मानले. नाईक याना शुभेच्छा देण्यासाठी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.









