अनिल बेनके चषक अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
अनिल बेनके स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित पाचव्या अनिल बेनके चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून राहुल्स केआर शेट्टी रायगड संघाने रामराज संघाचा 77 धावांनी, मोहन मोरे संघाने एसआरएस हिंदुस्थान संघाचा 26 धावांनी, साईराज वॉरियर्सने एवायएम अनगोळ अ संघाचा 5 गड्यांनी पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अहमद अस्कर, मंगेश वेटी, आशिष मेहरॉल यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

सरदार्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात राहुल्स केआर शेट्टी रायगड संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 5 गडी बाद 153 धावा केल्या. त्यात जयकुमारने 42, अंकुरसिंगने 39, बिलाल रजपूतने 33 धावा केल्या. रामराजतर्फे संतोष कासवाडकरने 3 तर जयसिंग पाटील, गौरव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना रामराज इलेव्हन संघाचा डाव 9.5 षटकात 76 धावात आटोपला. त्यात विशाल बेडकाने 21 तर लक्ष्मण पडियाळने 21 धावा केल्या. केआर शेट्टीतर्फे आशिष मेहरॉलने 10 धावात 7 गडी बाद करुन निम्म्याहून अधिक संघ गारद केला. त्याला सुमसिंग रावलने दोन गडी बाद करुन सुरेख साथ दिली.
दुसऱ्या सामन्यात मोहन मोरे संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 143 धावा केल्या. त्यात मंगेश वेटीने 73, रोहित नार्वेकरणे 35 धावा केल्या. एसआरएस अनगोळतर्फे दर्शन बांदेकरने 2 तर हर्षद आणि संदेश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसआरएस हिंदुस्थान संघाने 10 षटकात 8 गडी बाद 117 धावाच केल्या. त्यात दर्शन बांधेकरने 44 तर बिलाल नाईकने 17 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे मयुर वाघमारेने 3 तर गणेश डी ने 2 गडी बाद केले.
तिसऱ्या सामन्यात एवायएम अनगोळने प्रथम फलंदाजी करताना 9.5 षटकात सर्व गडी बाद 73 धावा केल्या. त्यात विठ्ठल चव्हाणने 23 तर प्रथमेश राठोडने 16 धावा केल्या. भूषण गोलेने 4, इलू इबादने 2, अहमद अस्करने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साईराज संघाने 5.5 षटकात 5 गडी बाद 74 धावा करुन सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात अहमद अस्करने 29 तर अमोल निलगुडीने 11 धावा केल्या. एवायएमतर्फे लक्ष्मण गावडेने 3 तर शफिकने 1 गडी बाद केला. झेन स्पोर्ट्स मुंबई व केआर शेट्टी किंग्स यांच्यातील चौथा सामना अंधूक प्रकाशामुळे अर्धवट आहे. तो सामना मंगळवारी सकाळी राहिलेल्या स्थितीत सुरु होणार आहे. मंगळवारी उपांत्य फेरीचे सामने खेळविण्यात येणार आहेत.









