उद्योजक संघटना अध्यक्षांच्या तक्रारीनुसार एमआयडीसीची कारवाई
प्रतिनिधी/ चिपळूण
लोटे उद्योजक संघटनेचे अध्यक्ष आणि आवाशी सरपंच ऍड. राज आंब्रे यांनी केलेल्या तक्रारीनुसार सीईटीपीतील सुरू असलेला गाळ उपसा एमआयडीसीने थांबवला आहे. मध्येच काम बंद करावे लागल्याने रासायनिक सांडपाण्यावरील प्रक्रिया करणे अशक्य असल्याचे सांगत सीईटीपीने उद्योगांचा डिस्चार्ज केवळ एका तासांवर आणून ठेवल्याने सर्वाचे ईटीपी प्लान्ट फुल्ल झाले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत मार्ग न निघाल्यास उद्योगांना आपले उत्पादन बंद ठेवण्याची वेळ येणार असल्याने हे एक नवे संकट सर्वांसमोर उभे ठाकले आहे.
एकेकाळी प्रचंड बदनामी वाटय़ाला आलेल्या लोटेतील सीईटीपीने गेल्या काही वर्षात अध्यक्ष सतीश वाघ यांच्या नेतृत्वाखाली कात टाकली आहे. एमआयडीसी आणि एमपीसीबी यांच्याकडून प्रकल्पाच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्यामुळे सांडपाण्याच्या व्यवस्थापनामध्ये आमुलाग्र बदल केले गेले. त्यामुळे सध्या हा प्रकल्प संपूर्ण राज्यातील सीईटीपींसाठी आदर्शवत असा प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. असे असतानाच सध्या या प्रकल्पाच्या विरोधात तक्रारींचा ससेमिरा सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रकल्पातील साठलेला गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवत हे काम स्थानिक ठेकेदाराला देण्यात आले. त्यानुसार काही दिवसांपासून गाळ काढणे सुरू झाले.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच एमआयडीसीने गाळ काढण्याचे काम थांबवले. उद्योजक संघटनेचे अध्यक्ष आणि आवाशीचे सरपंच आंब्रे यांनी गाळ साठवणुकीवर आक्षेप घेत तक्रार केल्याने एमआयडीसीने पुढील कार्यवाही केली. मात्र मुळातच नियमानुसार आणि सर्व परवानगी, सुरक्षेबाबतचे काटेकोर पालन करत असतानाही काम थांबवल्याने मोठे संकट उद्योगांपुढे उभे राहिले आहे. काम थांबल्यानंतर रासायनिक उद्योगांकडून सीईटीपीत केला जाणारा डिस्चार्ज हा अवघ्या तासावर आणून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे उद्योगांची मोठी गैरसोय झाली आहे. 3 एमएलडी सांडपाण्याची क्षमता असताना सध्या केवळ 1 एमएलडी सांडपाणी घेऊन प्रक्रिया केली जात असल्याने उद्योगांना उत्पादन काढणेही अवघड होऊन बसले आहे.
सध्या सीईटीपीतील गाळ काढण्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. उद्योगांतून आलेले सांडपाणी साठवून ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. डी सम्प परिसरात शेततळय़ासारखे खोदून त्यामध्ये प्लॅस्टीक टाकून काढलेल्या गाळाची साठवणूक केली जात आहे. साधारणपणे 15 मेपर्यंत गाळ उन्हात राहून तो घट्ट झाल्यानंतर तळोजा येथील वेस्ट मॅनेजमेंटमध्ये विल्हेवाटीसाठी पाठवला जाणार आहे. मुळातच तक्रारदार आणि ठेकेदार हे एकाच गावातील असून अन्य कुणाचीही यासंदर्भात तक्रार नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
लोटे सीईटीपी राज्यात आदर्श
गेल्या काही वर्षापासून सीईटीपी करत असलेल्या चांगल्या कामामुळे आज हा प्रकल्प राज्यातील सीईटीपींसाठी एक आदर्श प्रकल्प ओळखला जात आहे. वेगवेगळे तंत्रज्ञान वापरत तो अद्ययावत केला जात असतानाही त्याची बदनामी केली जात आहे. सीईटीपी हे लोटेतील उद्योगांचे हृदय आहे. ते सुरू राहणे हे सर्वांच्याच हिताचे आहे. वातानुकुलीत जागेत खुर्चीत बसून सहजपणे कुणाचे वाभाडे काढणे आणि सहजपणे टपली मारणे हे काहीना भूषण वाटते. पण माझ्या सहकाऱयांना मला सांगावंसं वाटतं की, आपण काही सकारात्मक काम करा. उद्योग मोठे होण्यासाठी प्रयत्न करा.
– डॉ. सतीश वाघअध्यक्ष, सीईटीपी लोटे









