पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर : विर्डीतील सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी /वाळपई
म्हादई नदीचा विषय फक्त पाण्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही. लोक, जंगल व पाणी यामुळे हा विषय महत्त्वाचा आहे. म्हादई नदीचे अस्तित्व अबाधित राखायचे असेल तर प्रत्येकाने म्हादई बचाव लढ्यामध्ये सहभागी व्हावे, तसेच विर्डी येथे सोमवार दि. 16 रोजी होणाऱ्या सभेला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पर्यावरण प्रेमी व म्हादई बचाव आंदोलनाचे प्रमुख प्रा. राजेंद्र केरकर यांनी केले.
वेळूस येथील देवस्थान प्रांगणात आयोजित जाहीर सभेत केरकर बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेस आमदार कार्लुस आल्मेदा फरेरा, सामाजिक कार्यकर्ते राजन घाटे, कांता गावडे, अॅङ शिवाजी देसाई, अविता बांदोडकर व इतर उपस्थित होते.
म्हादईच्या अस्तित्वासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा सुरू आहे. प्रत्येक सरकारने याबाबत गांभीर्य न दाखविल्यामुळे आजही दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात म्हादई नदीचे अस्तित्व नष्ट होणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्नाटक सरकारने राजकीय बळाचा वापर करून नदीचे पाणी वळवण्याचा घेतलेला निर्णय हा गोव्यासाठी मोठे जलसंकट निर्माण करणारा आहे. यामुळे आता गोमंतकीयानी सर्व मतभेद बाजूला सारून या लढ्यामध्ये सहभागी झाल्यास नदीचे अस्तित्व अबाधित राहू शकते. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील, असा इशारा राजेंद्र केरकर यांनी दिला.
म्हादई नदीच्या अस्तित्वासाठी निर्माण झालेल्या आंदोलनामध्ये सर्व प्रकारचे मतभेद विसरून गोमंतकीय जनतेने पुढे यावे अन्यथा त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील असे आमदार कार्लुस आल्मेदा फ्ढरेरा यांनी सांगितले.
म्हादई बचाव आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असून यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही असे काँग्रेस पक्षाच्यावतीने आमदार फ्ढरेरा यांनी जाहीर केले.
म्हादई नदीच्या संदर्भात निर्माण झालेली गोवा सरकारची गोची याला राजकीय नेते जबाबदार आहेत. कर्नाटक सरकारचा राजकीय दृष्ट्या फायदा करून देण्यासाठी म्हादईचा गळा घोटण्याचा प्रयत्न कर्नाटकाकडून करण्यात येत असून त्याला गोव्यातील राजकीय नेते छुपा पाठिंबा देत आहेत. नदीचे पाणी वळविण्यास कर्नाटक सरकार यशस्वी ठरले तर गोवा सरकार अपयशी ठरले. या अपयशाची जबाबदारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वीकारून पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी राजन घाटे यांनी केली.
अॅड. शिवाजी देसाई, सामाजिक कार्यकर्ते नितीन शिवडेकर, कांता गावडे यांनी यावेळी विचार मांडले. दशरथ मांद्रेकर यांनी स्वागत केले. सभेला सत्तरी तालुक्मयातील विविध गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









