सरकारी योजना राबविण्यासंदर्भातील बोलणी अंतिम टप्प्याच्या मार्गावर
प्रतिनिधी /काणकोण
कोरोना महामारीच्या काळात बंद ठेवण्यात आलेल्या खासगी बसेस पूर्ववत सुरू होण्याचे संकेत मिळायला लागले असून खासगी बसमालकांचा प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्याच्या बाबतीत सरकारने सकारात्मक भूमिका स्वीकारली असल्याची माहिती काणकोणच्या खासगी बसमालकांच्या एका प्रतिनिधीने अनौपचारिकरीत्या बोलताना दिली.
गोव्यात साधारणपणे 1700 इतक्या खासगी बसेस आहेत. काणकोण तालुक्यात एकूण 49 इतक्या खासगी बसेस असून या बसेस वाहतूक परवाना तसेच ज्या मार्गावरून त्या वाहतूक करतात त्याच्यासहित विकत घेण्याची तयारी सरकारने ठेवली आहे. सध्या ही बोलणी अंतिम टप्प्यात येण्याच्या मार्गावर आहेत. या बसेसची जबाबदारी कदंब महामंडळाकडे सुपूर्द करण्यात येणार असून दिवसाला 200 किलोमीटरपर्यंत वाहतूक करणाऱ्या बसेसना एक दर आणि त्यापुढील अंतर कापणाऱ्या बसेसना दुसरा दर निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती त्याने दिली.
खासगी बसेसवर चालक त्या त्या बसच्या मालकाने ठेवायचा असून वाहकाची नियुक्ती कदंब महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. वाहनाची देखभाल, डिझेलचा खर्च, टायर आणि अन्य खर्च याची जबाबदारी त्या त्या बसमालकावर राहणार असून त्यासाठी लागणारी रक्कम सरकारमार्फत देण्यात येणार आहे. कदंबचे निरीक्षक या बसेसची वारंवार तपासणी करणार आहेत. सध्या एकाच मार्गावरून एकाच वेळी दोन-तीन बसेस वाहतूक करतात. त्यामुळे बसमालकांत वारंवार संघर्ष निर्माण होत असताना दिसतो. त्याला ही योजना राबविल्याने आळा बसणार आहे.
काणकोण तालुक्यातील कित्येक मार्गांवरील खासगी बससेवा मागच्या दोन वर्षांपासून बंद असल्याचा सर्वाधिक परिणाम अंतर्गत मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर झालेला आहे. खासगी बसेस मिळेल त्या जागी पार्क करून ठेवलेल्या दिसत असून सरकारने जर ही सेवा ताब्यात घेतली, तर सध्या प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.









