फोन हिंडलगा कारागृहातून केल्याचे उघड : कैदी जयेश पुजारीची कसून चौकशी

प्रतिनिधी /बेळगाव
शंभर कोटींच्या खंडणीसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने फोनवरून धमकावल्याचे उघडकीस आले असून रविवारी नागपूर, कोल्हापूर व बेळगाव पोलिसांनी या कैद्यांची कसून चौकशी केली. शनिवारी रात्री कारागृहात मोबाईलसाठी तपासणी करण्यात आली असून तपास यंत्रणेच्या हाती मोबाईल मात्र लागला नाही.
शनिवार दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 11.29 वाजता नागपूर येथील गडकरींच्या संपर्क कार्यालयात फोन कॉल गेला. दाऊद इब्राहिमच्या गँगमधून बोलतो, असे सांगत 100 कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली. त्यानंतर 11.37 ला दुसरा फोन कॉल गेला आणि 12.29 ला तिसऱ्यांदा फोन करून खंडणीची मागणी करण्यात आली असून बेंगळूर येथे ही रक्कम पोहोचविण्यास सांगण्यात आले होते.
धनतोली-नागपूर शहर येथे असलेल्या नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या लँडलाईनवर धमकीचा कॉल गेला आहे. यासंबंधी धनतोली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. शनिवारी कोल्हापूर एटीएसच्या शिल्पा यमगार व सहकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारागृहात मोबाईलसाठी शोध घेतला. बेळगाव ग्रामीणचे एसीपी एस. व्ही. गिरीश व सहकाऱ्यांनीही या मोहिमेत भाग घेतला.
रविवारी नागपूरचे पोलीस निरीक्षक पवन मोरे हे बेळगावात दाखल झाले असून दिवसभर त्यांनी जयेश पुजारीची चौकशी केली आहे. केंद्रीयमंत्र्यांना धमकीच्या फोनकॉलमुळे महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्यांच्या पोलीस यंत्रणेबरोबरच केंद्रीय तपास यंत्रणांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. रविवारी रात्रीपर्यंत कारागृहात मोबाईल सापडला नाही.
उपलब्ध माहितीनुसार पोलीस तपासात हे कृत्य जयेश पुजारीने केल्याचे उघडकीस आले आहे. चौकशीत मात्र त्याने इन्कार केला आहे. जयेश ज्या बराकीत राहतो, त्या बराकीची झडती घेण्यात आली असून पोलिसांना एक डायरी मिळाली आहे. त्या डायरीत वेगवेगळे फोन नंबर असल्याची माहिती मिळाली आहे. ही डायरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
नागपूर व कोल्हापूरहून आलेल्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन जयेश पुजारीविषयी माहिती घेतली आहे. 21 एप्रिल 2018 रोजी येथील एपीएमसी पोलीस स्थानकात तत्कालिन पोलीस महानिरीक्षक अलोककुमार यांनी जयेशविरुद्ध फिर्याद दिली होती. नक्षलवादी असल्याचे सांगून जयेशने त्यांना धमकावले होते. एपीएमसी पोलीस ठाण्यातील माहितीही पथकाने मिळविली आहे. तपासाअंती महाराष्ट्र पोलीस रविवारी कोल्हापूर व नागपूरला रवाना झाले आहेत.
जयेशला ताब्यात घेणार
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून नागपूर पोलीस जयेश पुजारीला ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी नागपूर व बेळगाव येथील दोन्ही न्यायालयांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. रविवारी कारागृह प्रशासनाची परवानगी घेऊन त्याची चौकशी करण्यात आली आहे. आता त्याला कोठडीत घेऊन त्याची चौकशी करण्यात येणार आहे.
धमकी कशासाठी?
100 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जयेश पुजारीने धमकावल्याचे सामोरे आले असले तरी एकंदर त्याच्या आजवरच्या गुन्हेगारी कारकीर्दीचा आढावा घेतला असता नेहमी चर्चेत राहण्यासाठी तो असे फंडे राबवत असतो. त्याच्या डायरीत केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील फोन क्रमांकही आढळून आले आहेत. कारागृहात इतर कैदी व अधिकाऱ्यांनाही तो पैशासाठी वरचेवर धमकावत असतो, अशी माहिती मिळाली आहे.
जयेश पुजारीला ताब्यात घेणार
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून नागपूर पोलीस जयेश पुजारीला ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी नागपूर व बेळगाव येथील दोन्ही न्यायालयांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. रविवारी कारागृह प्रशासनाची परवानगी घेऊन त्याची चौकशी करण्यात आली आहे. आता त्याला कोठडीत घेऊन त्याची चौकशी करण्यात येणार आहे.









