चाफळची सीतामाई यात्रा उत्साहात
वार्ताहर/ चाफळ
तीर्थक्षेत्र चाफळ येथील श्री राम मंदिरात रविवारी अखंड सौभाग्याचं लेणं घेऊन हजारोच्या संख्येने नऊवारी साडय़ांच्या वेशभूषेत स्नेहपूर्वक एकत्र आलेल्या महिलांच्या उपस्थितीत श्री राम मंदिरात सीतामाईची यात्रा मोठय़ा उत्साही वातावरणात पार पडली. हळदी-कुंकवाने लाल-पिवळ्या झालेल्या सुवासिनींनी ‘तीळ नव्हे हलवा, येता-जाता बोलवा’, ’तीळगुळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत एकमेकांना आलिंगन दिले. कोरोनाच्या संक्रमणामुळे सलग दोन वर्षे सीतमाईची यात्रा भरली नाही. मात्र यावर्षी ही यात्रा मोठय़ा प्रमाणात भरल्याने मंदिर परिसर महिलांनी गजबजून गेला होता.
श्रीराम मंदीरामध्ये सन 1985 पासून महिलांच्या कल्पनेमधून सीतामाई यात्रेस प्रारंभ झाला. प्रतिवर्षाप्रमाणे महिलांच्या वाढत असलेल्या संख्येत प्रत्येक वर्षी नववधूंची पडणारी भर यामुळे या यात्रेस आगळे-वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. मकर संक्रातीला सीतामाईचे दर्शन घेऊन तिच्याकडून अखंड सौभाग्याचा वसा घ्यायचा. यामुळे सौभाग्य अखंड टिकते, अशी श्रध्दा आजही महिलांमधून जोपासली जात आहे. सीतामाईचा वसा घेण्यासाठी दरवर्षी मकरसंक्रातीला येईन, अशी प्रार्थना करणारे व्रत सलग 3 वर्ष केल्यास ते फलदायी ठरत असल्याची श्रध्दा महिलांमधून आजही दृढ असल्याने प्रतिवर्षी चाफळला सीतामाईच्या दर्शनासाठी येणाऱया महिलांच्या वाढ होऊ लागली आहे.
रविवारी सीतामाई यात्रेसाठी मंदिराच्या आवारात सकाळपासूनच महिलांनी गर्दी केली होती. ट्रस्टच्या वतीने महिलांना ववसा पूजण्यासाठी समर्थ सभागृह व बकुळीच्या झाडाखाली सोय करण्यात आली होती. याठिकाणी महिलांनी ववसा पूजन केले. दुपारी बारानंतर महिलांच्या गर्दीत वाढ होत गेल्याने सुवासिनींनी मिळेल, त्या ठिकाणी महिला विडे मांडून मनोभावे पूजा केली.
महिलांना दर्शन रांगेने जाण्यासाठीचे मार्गदर्शक बॅनर ठिकठिकाणी लावल्याने महिलांना दर्शनाचा व्यवस्थित लाभ मिळत होता. या यात्रेसाठी सातारा जिह्यातून मोठय़ा प्रमाणावर सुवासिनी दाखल झाल्या होत्या. महिलांना दर्शनासाठी ओळीने मंदिरात सोडण्यासाठी श्री समर्थ विद्यालयाचे आरएसपीचे विद्यार्थी तसेच 3 पोलीस अधिकारी, 25 महिला पोलीस, होमगार्ड यांनी परिश्रम घेतले. तहसीलदार रमेश पाटील, नायब तहसीलदार निवास थोरात यांनी यात्रेत उपस्थित राहून सूचना दिल्या. उपविभागीय अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, अंमलदार मनोहर सुर्वे, सिध्दनाथ शेडगे तसेच 40 महिला व पुरुष कर्मचारी, होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे यात्रेमध्ये खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन भोसुरे व डॉ. शहानवाज आतार यांचे मार्गदर्शनाखाली वैद्यकिय सुविधा पुरविण्यासाठी 20 कर्मचारी कार्यरत होते.
यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषराव जोशी, कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर, विश्वस्त दिलीप पाठक, एल. एस. बाबर, अनिल साळुंखे, बा. मा. सुतार, व्यवस्थापक धनंजय सुतार, सरपंच आशिष पवार, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र चोरगे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ यांनी परीश्रम घेतले.
महिलांनी संक्रातीमध्ये (सुगडीमध्ये) तीळ, गाजर, गुळ, बोरे, ऊस, पावटा, गव्हाच्या लोंब्या, शेंगा, हरभरा, बिबी, घेवडा घेऊन मनोभावे सीतामाईचा ववसा घेतला. सुवासिनींनी प्रथम सीतामाईस ओवाळले व नंतर दुसऱया सुवासिनींना ओवसले. यावेळी खाऊच्या पानावर खोबरे, खारीक, बदाम, सुपारी, हळदी-कुंकू ठेवून पाच सौभाग्यवतींच्या हातून ओटय़ात घातल्या जातात. यावेळी महिला एकमेकींना तिळगूळ देऊन आलिंगन देतात. सर्वत्र सुगडय़ांचा खच व हळदी-कुंकवाचा सडा पसरला होता.








