वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशनने पहिल्यांदाच इंडिया खुल्या 2023 च्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला बढती देण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेतला आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये या प्रतिष्ठेच्या बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवार 17 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रातून अव्वल 10 महिला बॅडमिंटनपटू सहभागी होत आहेत.
मंगळवारपासून सुरू होणारी महिलांची ही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा सुपर 750 दर्जाची राहिल. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगातील विविध देशांचे स्पर्धक सहभागी होणार आहेत. जपानची टॉप सिडेड अकेनी यामागुची, चीनची चेन युफेई, दक्षिण कोरियाची ऍन से यंग, भारताची पी. व्ही. सिंधू, थायलंडची रेचनोक इंटानोन, स्पेनची कॅरोलिना मॅरीन, चीनची ही बिंग जियाओ, चीनची चेन क्विंग चेन, जपानची कामी मात्सुयामा तसेच चिहारु शिदा आणि मलेशियाची पर्ले तेन आणि तानिया मुरलीथरन सहभागी होणार आहेत.
जपानची टॉप सिडेड यामागुची सध्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रात आघाडीची अव्वल बॅडमिंटनपटू म्हणून ओळखली जाते. 2021 आणि 2022 साली यामागुचीने सलग दोनवेळा विश्व चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत सलग सुवर्णपदके मिळवली असून आता ती भारतात होणाऱया इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पहिले जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. चीनच्या चेन युफेईने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. तिचे या स्पर्धेसाठी भारतात आगमन झाले असून नव्या वर्षाच्या बॅडमिंटन हंगामात 750 दर्जाची सुपर बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्यासाठी ती सज्ज झाली आहे. दक्षिण कोरियाच्या 20 वर्षीय ऍन से यंग हिने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक बॅडमिंटन कारकीर्दीत विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूर बॅडमिंटन सर्किटमधील 11 स्पर्धा जिंकल्या आहेत. भारताची अव्वल पी. व्ही. सिंधू हिने 2017 पासून आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सिंधूने आतापर्यंत दोनवेळा इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. सिंधूने पाचवेळा विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पदके मिळवली आहेत. थायलंडच्या इंटेनॉनने 2013 साली विश्व चॅम्पियन बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. तसेच तिने आतापर्यंत तीनवेळा म्हणजे 2013, 2016 आणि 2019 साली इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. स्पेनच्या कॅरोलिना मॅरीनने 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. तसेच तिने तीनवेळा विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱया स्पर्धेत जगातील अव्वल महिला बॅडमिंटनपटूंमध्ये जेतेपदासाठी कडवी चुरस राहिल.









