वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील डॉ. कर्नीसिंग नेमबाजी संकुलात झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी चाचणी स्पर्धेत महिलांच्या 25 मी. पिस्तूल नेमबाजीत महिला नेमबाज मनू भाकरने अव्वल स्थान पटकाविले.
सात दिवस चाललेल्या या निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत महिला स्पर्धकांना दोन गटात विभागण्यात आले होते. अ आणि ब असे दोन गट करण्यात आले होते. अ गटात भारतीय नेमबाजांनी आघाडीचे स्थान मिळवले. तर ब गटातील नेमबाज खुल्या निवड चाचणीसाठी पात्र ठरले. राष्ट्रीय नेमबाज संघाची निवड अ गटातील नेमबाजांच्या कामगिरीवर केली जाईल. या निवड चाचणी स्पर्धेत भारताची अव्वल महिला नेमबाज मनू भाकर अव्वल ठरली. पहिल्या पात्र फेरी चाचणीत तिने एकूण 581 गुण नोंदवले. मध्यप्रदेशची चिंकी यादव दुसऱया स्थानावर तर तेलंगणाची इशा सिंग तिसऱया स्थानावर राहिली.
2018 साली अर्जेंटिनात झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मनू भाकरने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. दिल्लीतील राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत दुसऱया पात्र फेरी अखेर मनू भाकरने पुन्हा अव्वल स्थान घेताना 590 गुण नोंदवले. अभिज्ञा अशोक पाटील दुसरे तर निवेदिता नायरने तिसरे स्थान घेतले. या स्पर्धेत पुरुषांच्या विभागात भारताचा विश्व चॅम्पियन नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने अ गटातील दुसऱया चाचणीत 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात अव्वल स्थान मिळवताना चेनसिंगचा 17-13 असा पराभव केला. रुद्रांक्षने पात्र फेरीमध्ये चौथे तर चेनसिंगने सहावे स्थान मिळवले आहे. महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझिशन प्रकारात सिप्त कौर समराने दोन्ही निवड चाचणी फेरीत आघाडीचे स्थान मिळवले. अंजूम मोदगिल आणि मेहुली घोष यांनी महिलांच्या 10 मी. एअर रायफल चाचणीच्या पहिल्या फेरीत अव्वल स्थान घेतले. तर रमिताने चाचणीची दुसरी फेरी जिंकली. 2024 साली होणाऱया पॅरीस ऑलिम्पिकचे तिकीट रुद्रांक्ष पाटीलने यापूर्वीच निश्चित केले आहे.









