वाहनांच्या रांगाच रांगा, रेल्वेने यंत्रणा सुधारण्याची गरज
प्रतिनिधी/ बेळगाव
टिळकवाडी येथील दुसरे रेल्वेगेट येथे शनिवारी सकाळी तब्बल अर्धातास रेल्वेगेट बंद होते. बेंगळूरहून आलेली एक्स्प्रेस रेल्वेफाटकात थांबल्याने गेट बंद होते. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. रेल्वेच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे नागरिकांना नेहमीच त्रास सहन करावा लागत असून रेल्वेच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.
रेल्वेस्थानकाचे काम सुरू असल्याने सिग्नल व्यवस्थेचे नुतनीकरण करण्यात येत आहे. परंतु मागील दोन महिन्यांपासून लोंढ्याहून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या एक्स्प्रेस दुसरे रेल्वेगेट परिसरात थांबत आहेत. रेल्वेस्थानकातून सिग्नल न मिळाल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वेस्थानकातून सिग्नल मिळेतोवर रेल्वे टिळकवाडी परिसरातच असते.
या परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये, कार्पोरेट ऑफिस असल्यामुळे नागरिकांची ये-जा असते. परंतु रेल्वेगेट वारंवार बंद केले जात असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक केंडी होत आहे. रेल्वे विभागाने याचा गांभीर्याने विचार करून यावर तोडगा काढण्याची गरज आहे.









