17 रोजी म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव तालुक्यातील 32 गावातील शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी रिंगरोडसाठी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी सध्या 15 गावातील शेतकऱ्यांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. 17 रोजी शिवबसवनगर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे, असे नोटिसीद्वारे कळविण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रिंगरोडसाठी तालुक्यातील विविध गावातील सुपिक जमीन घेण्याचा घाट घालण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी विरोध केला असतानादेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने धामणे, यरमाळ, येळ्ळूर यासह इतर 15 गावातील काही शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत रिंगरोडला जमीन देणार नाही, असे शेतकऱ्यांनी यापूर्वी आपल्या हरकती दाखल केल्या. त्यानंतर पुन्हा नोटिसा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांवर एकप्रकारे ही दडपशाही सुरू असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
दरम्यान 17 जानेवारी रोजी ज्या शेतकऱ्यांना नोटिसा आल्या त्यांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









