ब्रिटीश नागरिकत्व घेतल्यानंतर डांबले होते तुरुंगात ः ऋषी सुनक यांनी व्यक्त केला संताप
तेहरान / वृत्तसंस्था
इराणमध्ये आंदोलक आणि सरकारला विरोध करणाऱया लोकांना फाशीची शिक्षा देण्याची प्रक्रिया संपलेली नाही. नुकतीच इराणने ब्रिटीश नागरिकत्व स्विकारलेल्या माजी उपसंरक्षणमंत्री अलीरेझा अकबरी यांना हेरगिरीप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे.
अलीरेझा अकबरी यांच्याकडे इराण आणि ब्रिटनचे दुहेरी नागरिकत्व होते. त्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अलीरेझा यांना दिलेल्या फाशीबद्दल संताप व्यक्त केला आहे. इराणने क्रूर आणि भ्याड कृत्य केले आहे. इराणमध्ये सत्तेत असलेले नेते त्यांच्याच लोकांच्या मानवी हक्कांचा आदर करत नाहीत, हे यावरून दिसून येते, असे सुनक म्हणाले.
फाशीपूर्वी अलीरेझा अकबरी यांचा एक ऑडिओ उघड झाला होता. या ऑडिओमध्ये ते काही वर्षांपासून ब्रिटनमध्ये राहत असल्याचे सांगत आहेत. 2019 मध्ये त्यांना एका इराणी अधिकाऱयाने चर्चेसाठी बोलावले होते. अलीरेझा तेथे पोहोचल्यावर त्यांना अटक करण्यात आली होती. इराणच्या गुप्तचर मंत्रालयाने अलीरेझा अकबरीचे देशातील सर्वात मोठे घुसखोर म्हणून वर्णन केले आहे. ब्रिटनच्या ‘सीपेट इंटेलिजन्स सर्व्हिस’ला गुप्तचर माहिती पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.









