वृत्तसंस्था/ थिरुवनंतपुरम
यजमान भारत आणि लंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा औपचारिक सामना रविवारी येथे खेळविला जाणार आहे. भारताने यापूर्वीच या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली असून आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकतर्फी मालिका विजय मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यामध्ये काही नव्या गोलंदाजांना संधी देण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
भारतीय क्रिकेट संघाने या मालिकेत दर्जेदार कामगिरी केली असली तरी लंकेकडून कडवा प्रतिकार तितकाच कौतुकास्पद म्हणावा लागेल. गुवाहाटीमधील पहिला सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. भारताने या सामन्यात विजय मिळविला. पण त्यांना झगडावे लागले. त्यानंतर कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर भारतीय संघाने आपला विजय नोंदवित मालिका सिलबंद केली. भारतीय संघ ही मालिका एकतर्फी जिंकण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. कारण लंकेबरोबरची मालिका संपल्यानंतर केवळ 72 तासांच्या कालावधीत दर्जेदार न्यूझीलंडचा संघ भारतात मालिका खेळण्यासाठी येत आहे. न्यूझीलंड संघाने पाकविरुद्धची वनडे मालिका जिंकली असून आता ते आपली विजयी घोडदौड भारतातही राखण्यासाठी प्रयत्न करतील. भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही मालिकांमध्ये विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. कारण न्यूझीलंड संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा अधिक असल्याने भारताची सत्वपरीक्षा ठरेल. अर्थात ही आगामी मालिका घरच्या मैदानावर होत असल्याने त्याचा लाभ निश्चितच यजमान संघाला मिळू शकेल.

भारतीय संघ व्यवस्थापन आता रविवारच्या सामन्यासाठी कदाचित काही बदली गोलंदाजांना संधी देण्याचा विचार करीत आहे. सातत्याने मालिका सुरू असल्याने खेळाडूंवर अधिक वर्कलोडचे दडपण येत आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने काही राखीव खेळाडूंना मैदानात उतरविण्याचे ठरविले आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत भारतीय संघाला सातत्याने दौरे करावे लागले. त्यामुळे खेळाडूंना विश्रांतीची गरज भासत असल्याचे दिसून येते. टप्प्याटप्प्याने खेळाडूंना विश्रांती देण्यावर विचार केला जात आहे. सातत्याने होत असलेल्या दुखापती तसेच दमछाक या समस्यांवरही लक्ष देणे जरुरीचे आहे. निवड समितीने टी-20 संघाचे नेतृत्व हार्दिक पांडय़ाकडे तर वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपविले आहे. आता ईशान किसन, सूर्यकुमार यादव हे महत्त्वाचे फलंदाज भारतीय संघात भक्कम झाल्याचे दिसून येते. मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजाला कदाचित रविवारच्या सामन्यात विश्रांती दिली जाईल, असा अंदाज आहे. आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत वेगवान गोलंदाजांवर सातत्याने होत असलेल्या मालिकांमुळे वर्कलोडचा ताण वाढत असल्याचे दिसून येते. नवोदित डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंग याच्यावर नव्या चेंडूची भिस्त सोपविण्यात येईल.
थिरुवनंतपुरमच्या खेळपट्टीवर कुलदीप यादवची फिरकी अधिक प्रभावी ठरू शकेल. यजुवेंद्र चहल जखमी असल्याने त्याला तिसऱया सामन्यात विश्रांती दिली जाईल. त्याचप्रमाणे या शेवटच्या सामन्यावेळी संघाचे प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड उपस्थित राहणार नाहीत. या सामन्यावेळी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे भारतीय संघाबरोबर राहतील. मध्यंतरी कुलदीप यादवला संघात स्थान मिळू शकले नव्हते. पण लंकेविरुद्धच्या दुसऱया सामन्यात कुलदीपने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर संघाला सामना आणि मालिका विजय मिळवून दिला. चालू वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय निवड समितीने आतापासूनच खेळाडूंची चाचपणी सुरू केली आहे. विविध मालिकांसाठी वेगवेगळय़ा खेळाडूंना संधी देण्याचे ठरविले आहे. अष्टपैलू अक्षर पटेलला कदाचित या सामन्यात विश्रांती मिळण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. भारताची फलंदाजी समाधानकारक आणि भक्कम असून रोहित शर्मा, गिल, कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किसन हे प्रमुख फलंदाज आहेत. आता गिल आणि ईशान किसन यांच्यात सलामीच्या फलंदाजासाठी चुरस निर्माण झाली आहे.
लंकन संघाने या मालिकेत पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करला असला तरी या संघाची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल. भारताला विजयासाठी या मालिकेतील गेल्या दोन सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत झगडावे लागले. रविवारचा हा शेवटचा सामना औपचारिक असला तरी लंकेचा संघ आपला संभाव्य व्हाईटवॉश टाळण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल. रविवारच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल तितकाच महत्त्वाचा असून दोन्ही संघ नाणेफेकीनंतरच अंतिम अकरा खेळाडू निश्चित करतील.
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांडय़ा (उपकर्णधार), गिल, कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, ईशान किसन, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग.
लंका- दासुन शनाका (कर्णधार), कुशल मेंडीस (उपकर्णधार), निशांका, अविष्का फर्नांडो, समरविक्रमा, असालेंका, धनंजय डिसिल्वा, हसरंगा, बंदारा, महेश तिक्ष्णा, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, रजिता, नुवांदू फर्नांडो, वेलालगे, प्रमोद मधुशन आणि लाहिरू कुमारा.
सामन्याची वेळ- दुपारी 1.30 पासून.









