ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सूर्यकुमार, ईशानची निवड
वृत्तसंस्था/ मुंबई
न्यूझीलंडचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱयावर वनडे आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी येत आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय क्रिकेट निवड समितीने भारतीय संघ घोषित केला असून के. एल. राहुल आणि अक्षर पटेल यांना ही मालिका हुकणार आहे. निवड समितीने या दोन स्वतंत्र मालिकांसाठी दोन वेगवेगळे संघ जाहीर केले आहेत. मुंबईचा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ ला टी-20 मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारी-मार्च दरम्यान होणाऱया कसोटी मालिकेसाठी निवड समितीने सूर्यकुमार यादव आणि ईशान किसन यांचा कसोटी संघामध्ये समावेश केला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. वनडे मालिकेला 18 जानेवारीपासून तर टी-20 मालिका 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान खेळविली जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज के. एल. राहुल तसेच अष्टपैलू अक्षर पटेल काही कौटुंबिक समस्येमुळे उपलब्ध होऊ शकणार नाहीत.
न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांडय़ाकडे नेतृत्व सोपविले जाणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर खेळणार नाहीत. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी यष्टीरक्षक के. एस. भरत, वॉशिंग्टन सुंदर, शहाबाज अहमद आणि शार्दुल ठाकुर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. 2023 च्या रणजी हंगामात आसामविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉ ने 379 धावांची खेळी करत निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. या कामगिरीमुळे त्याला टी-20 संघात स्थान देण्यात आले आहे. रणजी स्पर्धेच्या इतिहासामध्ये पृथ्वी शॉ ची ही दुसऱया क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. महाराष्ट्राचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याचाही टी-20 संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. लंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱया सामन्यात गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करणारा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात संधी देण्यात आली आहे. जितेश शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांनी मात्र टी-20 संघातील आपले स्थान कायम राखले आहे. वेगावान गोलंदाज जसप्रीत बुमराह अद्याप दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला नसल्याने त्याचा या दोन्ही आगामी मालिकांसाठी निवड समितीने विचार केला नाही.
भारत टी-20 संघ- हार्दिक पांडय़ा (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किसन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ आणि मुकेशकुमार.
भारत वनडे संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किसन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, के. एस. भरत, हार्दिक पांडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, शहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.









