मूळ आराखडय़ातील अनेक वैशिष्टय़ांची जोड मिळणे बाकी, आता सुसज्ज ‘वेलनेस सेंटर’सह अनेक सुविधा साकारणार, सध्या बनला आहे लोकप्रिय ‘पिकनिक स्पॉट’

प्रसाद तिळवे /सांगे
सांगेतील सौंदर्यात भर घालणारे साळावली धरण आणि त्याच्या पायथ्याशी असलेले बोटॅनिकल गार्डन नि रिक्रिएशनल पार्क म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी असून या गार्डनचा चेहरामोहरा येणाऱया काळात बदलणार आहे. हल्लीच गोवा वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा असलेल्या आमदार दिव्या राणे यांनी भेट देऊन येथे ‘वेलनेस सेंटर’ची उभारणी करण्याची घोषणाही केली आहे. त्यातच आदिवासी कारागीरांचे ग्राम, टॉय ट्रेन, गॅझेबॉस, उंच मनोरा, संगीत कारंजे, कॉटेजिस आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्याकरिता आमदार आणि समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई प्रयत्नरत आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या बोटॅनिकल गार्डन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची 30 मे, 2003 रोजी त्यांनी पायाभरणी केली होती. पण केवळ उद्याननिर्मितीच्या पलीकडे प्रकल्प गेलाच नाही. म्हैसूरच्या वृंदावन गार्डनच्या धर्तीवर हे उद्यान निर्माण करायचे होते. पण ते कागदावरच राहिले. आता कुठे त्याला गती प्राप्त होत आहे. एरव्ही पावसाळ्यात येथील आनंद निराळाच असून सध्या बोटॅनिकल गार्डनचा उत्कृष्ट पिकनिक स्पॉट म्हणून नोव्हेंबर ते मेंपर्यंत वापर होतो.
या प्रकल्पाची पायाभरणी करताना बोटॅनिकल गार्डन नि रिक्रिएशनल पार्कची निर्मिती, जपानी गार्डन-रॉक गार्डन, फुलपाखरांचे उद्यान आणि पक्ष्यांचा विभाग, रंगीत-संगीत कारंजे आणि छोटे धबधबे, नौकाविहार आणि जलक्रीडा सुविधा, कुटिरे आणि धरणाच्या ठिकाणी कॅम्पिंगच्या सुविधा निर्माण करणे या वैशिष्टय़ांचा समावेश होता. एकूण 19 वर्षांचा काळ लोटला असून यापैकी अनेक बाबी होणे बाकी आहे. धरणाच्या ठिकाणी इको-टुरिझमला प्रोत्साहन आणि स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी हे लाभ सदर प्रकल्प साकार झाल्यानंतर अपेक्षित धरण्यात आले होते. पण निधीच्या अभावी गार्डनमध्ये विविध सुविधा निर्माण करण्याकडे वेळोवेळी दुर्लक्षच झाले. आता स्थानिक आमदार सुभाष फळदेसाई यांना मंत्रिपद मिळाल्याने बोटॅनिकल गार्डनचे उर्वरित काम वेगाने पुढे जाण्याची अपेक्षा आहे.
विविध सुविधा उपलब्ध
सर्व सुविधांनी युक्त उद्यान पर्यटकांच्या सेवेला उपलब्ध झाले नसले, तरी विविध प्रकारची असंख्य लहान-मोठी झाडे लावली गेली असून त्यांची बऱयापैकी वाढ होऊन निगा घेण्यात येत आहे. सर्वत्र हिरवळ, औषधी झाडांचे तसेच गुलाबांचे उद्यान, मुलांसाठी खेळण्याची जागा आणि पार्क, पर्यटकांना बसण्यासाठी जागा आणि पदपथ तयार केलेला आहे. तसेच एक छोटा धबधबा व कॅफेटेरिया आहे. महत्त्वाचे म्हणजे हल्लीच तीन लाकडी कॉटेजिस बांधण्यात आलेल्या असून त्या पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत.
वेलनेस सेंटर साकारणार
बोटॅनिकल गार्डन परिसरात सुमारे 40 ते 50 कोटी खर्च करून उत्तम दर्जाचे वेलनेस सेंटर उभारण्यात येणार असून त्यामध्ये निसर्गोपचार, आयुर्वेदिक उपचार, योग, मसाज आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. देशीच नव्हे, तर विदेशी पर्यटकही थेट विमानतळावरून या केंद्रात येतील, असे गोवा वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा दिव्या राणे यांनी सांगितलेले आहे. साळावली धरण व बोटॅनिकल गार्डनला चालना देण्याबरोबरच पर्यटनदृष्टय़ा येथे विविध सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. समाजकल्याणमंत्री फळदेसाई यांच्या उपस्थितीत त्यांनी हल्लीच साळावली धरण आणि बोटॅनिकल गार्डनला भेट देऊन आढावा घेतलेला आहे.
मुंबईतील हँगिंग गार्डनपेक्षा बोटॅनिकल गार्डन सुंदर असून वनविकास महामंडळाकडे गार्डनच्या बाजूस अतिरिक्त जागा आहे. त्याचा वापर करून सर्व सुविधांनी युक्त असे उत्तम दर्जाचे वेलनेस सेंटर उभारण्यात येणार आहे. केरळ राज्यात अशा प्रकारची केंद्रे आहेत. येथे उपचार आणि अन्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी येणारी व्यक्ती आठवडाभर राहू शकते. शहरात राहण्यापेक्षा लोक येथे राहण्यास जास्त पसंती देतील. वेलनेस सेंटरचा आराखडा तयार असून लवकरच काम सुरू करण्यात येईल, असे राणे यांनी या भेटीवेळी सांगितले होते.
उत्तम ‘पिकनिक स्पॉट’
साळावली धरण आणि बोटॅनिकलचा गार्डनचा परिसर विलोभनीय असून तमाम पर्यटकांनी येथे भेट देऊन आनंद लुटला पाहिजे. पर्यटकांसाठी येथे तीन सुंदर निसर्गाच्या सहवासातील कॉटेजिस आहेत. त्यांचा पर्यटकांनी उपयोग करून घेतला पाहिजे. आगामी काळात धरण परिसरात 20 कॉटेजिस बांधण्यात येणार असून बोटॅनिकल गार्डनमध्ये आरोग्य पर्यटनाला उत्तजन देण्यात येणार आहे. येथे वर्षाकाठी अनेक शालेय विद्यार्थ्यांच्या सहली येतात. हा एक उत्तम पिकनिक स्पॉट बनलेला आहे. धरण परिसरातच कुणबी हस्तकला केंद्राची उभारणी होणार आहे, अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
बोटॅनिकल गार्डनला भेट देणाऱया प्रोढ पर्यटकासाठी रु. 40 तर मुलांसाठी रु. 20 अशी प्रवेश फी आकारली जाते. सकाळी 9 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत गार्डन खुले असते. मध्यंतरी माजी आमदार प्रसाद गावकर हे वनविकास महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यावेळी वनविकास महामंडळाला कामे राबविण्यासाठी निधी उपलब्ध करण्याच्या बाबतीत सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी केली होती. नंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता खुद्द विश्वजित राणे हे वनमंत्री आहेत. त्यामुळे सुविधा निर्माण करण्यात अडचणी येणार नाहीत, अशी लोकांची अपेक्षा आहे. एकूणच गोव्याच्या सौंदर्यात भर घालणारा आणि माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न राहिलेला हा प्रकल्प गती घेऊ पाहत आहे. तो नेटाने पुढे जाईल आणि इको-पर्यटन भरारी घेईल याच आशेने सांगेतील जनता त्याच्या विकासाकडे नजर लावून बसली आहे.









