खासदार-अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन : कडोली येथे स्वराज्य संकल्प मेळावा उत्साहात
वार्ताहर /कडोली
स्वराज्य संकल्प मेळाव्यास माता-माऊल्या मोठ्या संख्येने येतात. येथेच समाजाचं भवितव्य सुरक्षित हातात आहे, याची खात्री पटते. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर स्वराज्य निर्माण झाले नसते आणि जिजाऊ माता जन्माला आल्या नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते. या स्वराज्य संकल्प मेळाव्याला या माऊल्या आल्याने मनाला समाधान वाटते, असे उद्गार खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी काढले.
कडोली येथे यमकनमर्डी मतदार क्षेत्रातील बहुजन समाजाच्यावतीने आयोजित स्वराज्य संकल्प मेळाव्यात डॉ. कोल्हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. डॉ. अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, लहान लेकरांवर संस्कार करणाऱ्या त्यांच्या माऊलींना मानाचा मुजरा करावासा वाटतो. अलीकडे टीव्ही, मोबाईलच्या गर्दीत कुठंतरी आपला इतिहास हरवतो की काय, अशी भीती वाटत असताना इतिहास जागविण्याचा प्रयत्न होतो हे अभिमानाचे आहे. आजचा स्वराज्य संकल्प मेळावा काय आहे, कशासाठी करायचा, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले की मन भरून येते. शिवाजी महाराजांकडे नितीमत्ता आणि नैतिकता होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे नाव घेतले की प्रत्येकाची मान अभिमानाने उभी राहते.
यावेळी डॉ. अमोल कोल्हे भाषेबद्दल बोलताना म्हणाले, आईमुळे मावशीचा दु:खास करू नका आणि मावशीमुळे आईचा दु:खास करू नका. कारण भाषेवरून आम्ही एकमेकांशी भांडत असलो तर महागाईची झळ दोघांनाही बसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले. एकमेकात बंधुता निर्माण करून स्वराज्य संकल्पनेचा विडा उचलला. त्यामुळे आज आपण अभिमानाने जगतो आहे.
छत्रपती शिवाजी महाराज असा जगात एक राजा होता की त्यांनी कोणाच्याही पाठीत खंजीर खूपसून स्वराज्य मिळविले नाही. किंवा कोणाचे वाईट केले नाही. स्वराज्य संकल्पनेचे बीज रोवून सर्वांना घेऊन स्वराज्य निर्माण केले, हे राजांचे उद्दिष्ट होते. कर्तृत्वाच्या जोरावर दैवत्वावर प्रभुत्व मिळविता येते हे राजानं दाखवून दिले आहे.
याप्रसंगी राष्ट्रीय धर्माचार्य भगवानगिरी महाराज यांनी बोलताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मात राहूनच आपला विकास करून घेतला पाहिजे हे तत्त्व उराशी बाळगून जिजाऊंचे आशीर्वाद पाठीशी घेऊन आणि सर्व जातीच्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण केले आहे.
तर श्री दूरदुंडेश्वर विरक्त मठाचे मठाधीश पूज्य श्री गुरुबसवलिंग स्वामीजी यांनी सांगितले की, भारतात प्रत्येक 100 कि.मी.ला वेगवेगळ्या जातीचे लोक आढळतात. पण आमची सर्वांची संस्कृती एकच आहे आणि ती म्हणजे आमची भारतीय संस्कृती होय, असे उद्गार काढले.
प्रारंभी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे गावच्या वेशीत जल्लोषात स्वागत करून त्यांना मिरवणुकीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणण्यात आले. त्याठिकाणी शिवपुतळ्याची डॉ. कोल्हेंच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित स्वराज्य संकल्प मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. याठिकाणी कडोली ग्रामस्थांच्यावतीने डॉ. अमोल कोल्हे, भगवानगिरी महाराज, युवा कार्यकर्ता राहुल जारकीहोळी आणि पूज्य श्री गुरुबसवलिंग महाराज यांचे शाल, पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. ग्रा. पं. सदस्य राजू मायाण्णा यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे औचित्य साधून हिंडलगा येथील शाहीर व्यंकटेश देवगेकर आणि सहकाऱ्यांनी ‘सह्याद्रीचा सिंह गर्जतो’ हा पोवाडा सादर केला.









