संयुक्त राष्ट्र / वृत्तसंस्था
संयुक्त राष्ट्रामध्ये गुरुवारी झालेल्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर ताशेरे ओढले. आपल्या क्षुल्लक राजकीय फायद्यासाठी शेजारील देशांमध्ये दहशतवाद पसरवणाऱया देशांना जबाबदार धरले पाहिजे, असे भारताने म्हटले आहे. भारताच्या प्रतिनिधीने थेट देशाचे नाव घेत पाकिस्तानवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. दहशतवादाविरोधात आता जगातील देशांनी एकत्र उभे राहायला हवे, असेही भारताने म्हटले आहे. सुरक्षा परिषदेच्या या बैठकीत भारताने सीमा कराराचे उल्लंघन करणाऱया चीनवरही अप्रत्यक्ष टीका केली.
जपानच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सुरक्षा परिषदेत खुली चर्चा झाली. यादरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर कायद्याची चौकट असायला हवी, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी व्यक्त केली. कायद्याच्या चौकटीमुळे आक्रमकता, दहशतवाद यापासून देशांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला धोका निर्माण होणार नाही. दहशतवादासारख्या धोक्मयांचा सामना करण्यासाठी सर्व देश एकत्र येतील तेव्हाच हे शक्मय होईल. राजकीय फायद्यासाठी दुटप्पीपणा स्वीकारू नये, असे परखड बोल कंबोज यांनी सुनावले.
सर्व देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केल्यास कायद्याची निश्चित रुपरेषा आखता येईल. करारांचे पालन करणे ही कायद्याच्या राज्याची पहिली अट आहे. अर्थातच दोन देशांदरम्यान झालेल्या करारांचे पालन केले पाहिजे आणि त्यात बदल करण्याचा एकतर्फी प्रयत्न करू नये, असे सांगत भारतीय प्रतिनिधी कंबोज यांनी चीनवरही मोजक्मया शब्दात निशाणा साधला.
गुटेरेस यांच्याकडूनही पाठराखण
या बैठकीत संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेसही सहभागी झाले होते. यादरम्यान, सध्या जगात कायद्याचे राज्य कमकुवत झाले आहे. प्रत्येक देश आणि प्रदेशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. मानवी जीवितहानी, गरिबी आणि उपासमारीत वाढ झाली आहे. काही देश बेकायदेशीरपणे अण्वस्त्रे वापरत आहेत. रशिया-युपेन युद्धामुळे जगात मोठे मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. कोणत्याही देशाला त्याच्या हद्दीत सामील होणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे, असे गुटेरेस यांनी आपल्या भाषणात सांगितले.









