केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य ः 3 महिन्यात ऍक्शन प्लॅन तयार करणार
वृत्तसंस्था / राजौरी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरचा दौरा केला. या दौऱयादरम्यान राजौरी येथील दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांशी त्यांनी चर्चा केली आहे. त्यानंतर गृहमंत्र्यांनी अधिकाऱयांसोबत सुरक्षेसंबंधी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. सुरक्षा यंत्रणा काश्मीरमध्ये अत्यंत सतर्कपणे काम करत आहेत. दहशतवादाच्या खात्म्यावरून अनेक पैलूंवर चर्चा झाली आहे. सुरक्षाचक्र तयार करण्याची योजना हाती घेण्यात येणार असल्याचे शाह यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
राजौरी येथील हल्ल्याप्रकरणी एनआयए तपास करत आहे. सरकारने दोन्ही घटनांचा (धनगरी येथील दहशतवादी हल्ले) तपास सोपविला आहे. एनआयए आणि जम्मू-काश्मीर पोलीस मिळून याचा तपास करतील. जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेसाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. राजौरी येथील पीडितांशी माझे बोलणे झाले आहे. 3 महिन्यात काश्मीरच्या प्रत्येक क्षेत्राच्या सुरक्षेला मजबूत करण्यात येणार आहे. दहशतवाद्यांचे कट हाणून पाडण्यासाठी आमच्या यंत्रणा अत्यंत प्रभावीपणे काम करत सुरक्षा प्रदान करणार असल्याचा विश्वास जम्मूतील लोकांना देऊ इच्छितो असे उद्गार शाह यांनी काढले आहेत.
मागील दीड वर्षात झालेल्या सर्व हल्ल्यांचा अभ्यास करत तपास केला जाणार आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून बोललो आहे. प्रतिकूल हवामानामुळे त्यांची भेट घेण्यासाठी जाता आले नाही. राज्यपाल मनोज सिन्हा यांनीही पीडितांशी चर्चा केली असल्याचे शाह म्हणाले.









