वयाच्या 75 व्या वर्षी गुरुवारी रात्री घेतला अखेरचा श्वास
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे गुरुवारी रात्री उशिराने दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्यांची मुलगी शुभाषिनी यादव यांनी ‘पापा इज नो मोअर’ असे ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी मध्यप्रदेशातील नर्मदापुरम जिह्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शरद यादव यांची प्रकृती बऱयाच दिवसांपासून खराब होती. गुरुवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. याचदरम्यान गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी त्यांचे पार्थिव दिल्लीत अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आले होते. आता शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. नर्मदापुरम (होशंगाबाद) जिह्यातील बाबई तालुक्यातील आंखमऊ या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जेडीयूचे माजी मध्यप्रदेश युनिटचे प्रमुख गोविंद यादव यांनी शुक्रवारी दिली. त्यांचे पार्थिव दिल्लीहून विमानाने मध्यप्रदेशात नेण्यात येणार आहे.
पंतप्रधानांसह राजकीय नेत्यांची श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालूप्रसाद यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, विरोधी पक्षनेते विजय सिन्हा, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त करताना, शरद यादव यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात एक संसदपटू आणि मंत्री म्हणून स्वतःला सिद्ध केल्याचे ट्विट केले आहे. डॉ. लोहिया यांच्या आदर्शांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. मी त्यांच्याशी केलेल्या चर्चा-संभाषणांची नेहमी जपणूक करेन, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
लालूंनाही दुःख
लालूप्रसाद यादव यांनी शोक व्यक्त करताना सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला आहे. ‘मी सध्या सिंगापूरमध्ये असून मला शरद भाईंच्या जाण्याची दुःखद बातमी समजली. त्यांच्या निधनामुळे मला खूप असहाय्य वाटते. शरद भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली!’ अशा शब्दात लालूंनी दुःख व्यक्त केले.
वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री
शरद यादव यांनी 1999 ते 2004 दरम्यान अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये विविध खात्यांवर मंत्री म्हणून काम केले होते. 2003 मध्ये शरद यादव जनता दल युनायटेडचे (जेडीयू) अध्यक्ष होते. तसेच ते एनडीएचे निमंत्रकही होते. 2018 मध्ये जेडीयूपासून वेगळे झाल्यानंतर, लोकशाही जनता दलची (एलजेडी) स्थापना झाली. गेल्यावषी त्यांनी आपला पक्ष आरजेडीमध्ये विलीन करण्याची घोषणा केली होती.
बालपणापासून चमकदार कामगिरी
शरद यादव हे प्रामुख्याने मध्यप्रदेशातील नर्मदापुरम (होशंगाबाद) जिह्यातील बाबई गावचे रहिवासी होते. त्यांचा जन्म 1 जुलै 1947 रोजी शेतकरी कुटुंबात झाला. 1971 मध्ये जबलपूरमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना त्यांना राजकारणात रस निर्माण झाला. येथे त्यांची विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी बीई ‘सिव्हिल’मध्ये सुवर्णपदक पटकावले होते. राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. लोहिया यांच्या आंदोलनात ते अनेकदा सहभागी होत असत. यादरम्यान त्यांना ‘मिसा’ अंतर्गत अनेकवेळा अटक करण्यात आली. 1970, 72 आणि 75 मध्ये त्यांना तुरुंगात जावे लागले होते. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यातही शरद यादव यांची महत्त्वाची भूमिका होती.
राजकीय कारकीर्द
1974 मध्ये जबलपूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवत शरद यादव यांनी सक्रिय राजकारणात एन्ट्री केली. पोटनिवडणुकीत ही जागा जिंकण्यात यशस्वी झाल्यानंतर ते पहिल्यांदा संसद भवनात पोहोचले. यानंतर 1977 मध्येही ते याच जागेवरून खासदार म्हणून निवडून आले. त्यांना युवा जनता दलाचे अध्यक्षही करण्यात आले. यानंतर ते 1986 मध्ये राज्यसभेवर निवडून गेले. तीन राज्यांतून लोकसभा निवडणूक जिंकणारे शरद यादव बहुधा भारतातील पहिले नेते आहेत. 1989 मध्ये, राज्यसभेवर गेल्यानंतर तीन वर्षांनी, त्यांनी उत्तर प्रदेशमधील बदाऊन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. 1989-90 दरम्यान ते केंद्रीय मंत्री होते. त्यांच्याकडे वस्त्राsद्योग आणि अन्न प्रक्रिया मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. उत्तर प्रदेशनंतर 1991 मध्ये ते बिहारमधील मधेपुरा लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. यानंतर 1995 मध्ये ते जनता दलाचे कार्याध्यक्ष म्हणून निवडून आले आणि 1996 मध्ये ते पाचव्यांदा खासदार झाले. 1997 मध्ये त्यांची जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. 1999 मध्ये त्यांच्याकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला. तसेच 1 जुलै 2001 रोजी त्यांची केंद्रीय कामगार मंत्रालयात कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाली. 2004 मध्ये ते दुसऱयांदा राज्यसभेचे खासदार झाले. 2009 मध्ये ते सातव्यांदा खासदार झाले, पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मधेपुरा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला होता.









