शांतता मोहिमेत सहभाग ः सूडानमध्ये पहिल्यांदाच महिला सैनिकाने केले संचलनाचे नेतृत्व
वृत्तसंस्था / मालाकल
दक्षिण सूदानमध्ये 1171 भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेत उत्कृष्ट सेवा बजावल्याप्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघ (युएन) पदकाने गौरविण्यात आले आहे. या सैनिकांमध्ये 5 महिलांचा देखील समावेश आहे. यंदा पहिल्यांदाच महिला अधिकारी मेजर जास्मीन चट्ठाने संचलनाचे नेतृत्व केले आहे. भारतीय सैन्य महिलांना नेतृत्व करण्याची संधी देत दक्षिण सूदानचे नागरिक आणि महिलांना एक ठाम संदेश देत असल्याचे जास्मीन यांनी म्हटले आहे.
दक्षिण सूडानमध्ये भारतीय सैन्य लोकांचा जीव वाचविण्यापासून रस्तेनिर्मितीपर्यंतचे कामे करत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ पदकाने गौरविण्यात आलेल्या महिलांमध्ये भारतीय सैन्याच्या एक इंजिनियर करिश्मा कथायतचाही समावेश आहे. दक्षिण सूदानमध्ये भारतीय सैनिक वैद्यकीय सुविधाही उपलब्ध कर तआहेत. सप्टेंबरमध्ये भारतीय सैन्याच्या वैद्यकीय कर्मचाऱयांनी तातडीची शस्त्रक्रिया करत 5 मुलांचा जीव वाचविला होता. पीसकीपर मेजर अमनप्रीत कौर यांनी योग्यवेळी या मुलांवर शस्त्रक्रिया झाली नसती तर त्यांचा मृत्यू होऊ शकला असता असे सांगितले आहे.
175 सैनिकांचे सर्वोच्च बलिदान
भारतीय सैनिकांना युएन पदकाने सन्मानित करताना फोर्स कमांडर लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रमनियन यांनी सैन्याच्या सर्व सैनिकांनी उत्तम कार्य करत हजारो लोकांना सुरक्षा देत त्यांचा जीव वाचविला असल्याचे म्हटले आहे. भारतीय सैन्याचे हे कार्य दक्षिण सूदान नेहमीच स्मरणात ठेवणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पीसकीपिंग विभागानुसार संयुक्त राष्ट्रसंघाने 70 हून अधिक शांतता मोहिमा आतापर्यंत पूर्ण केल्या आहेत. यात भारतीय सैन्याचे मोठे योगदान राहिले आहे. या शांतता मोहिमांमध्ये भाग घेत भारताचे सर्वाधिक 175 सैनिक हुतात्मा झाले आहेत. या सर्व मोहिमांमध्ये सर्वाधिक सैनिक पाठविणाऱया देशांमध्ये भारत आणि पाकिस्तानचा समावेश आहे.
पाकिस्तानी सैनिकांवर उपचार
2012 मध्ये भारतीय सैन्याने जखमी पाकिस्तानी सैनिकांवर उपचार केले होते. काँगो येथील चकमकीत पाकिस्तानी सैनिक जखमी झाले होते. त्याच देशात भारतीय सैनिकही तैनात होते. भारतीय सैन्याचे गोमा येथील युनिटमध्ये पाकिस्तानच्या 8 सैनिक आणि एका अधिकाऱयाला उपचारासाठी आणले गेले होते. यानंतर पाकिस्तानच्या सेक्टर कमांडरने रुग्णालयाचा दौरा करत भारतीय ब्रिगेड कमांडरचे आभार मानले होते.









