दहा हजारात कसे भरायचे पोट; बालरथ कामगारांची सरकारकडे याचना : 2016 मधील आंदोलनानंतर वेतनात केवळ दहा टक्के वाढ : 15 दिवसांत मागण्या पूर्ण करा, अन्यथा पुन्हा आंदोलन : सुरक्षेच्यादृष्टीने कोणत्याच सुविधा नसतानाही प्रामाणिक सेवा : विद्यार्थ्यांच्या पालकांनी द्यावी साथ
प्रतिनिधी / पणजी
पहाटे उठून शाळेत जाण्यासाठी धाव धाव करायची, त्यानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षित आणायचे आणि सोडायचे इतके कष्ट घेऊन गेली बारा वर्षे अगदी अल्प पगारात सेवा देऊनही माय-बाप सरकार आमच्या प्रश्नांकडे कधी लक्ष देणार? असा प्रश्न उपस्थित करीत काल गुरुवारी पणजीतील आझाद मैदानावर राज्यातील बालरथ कर्मचाऱयांनी एकजूट दाखवत समस्या सोडविण्यासाठी सरकारकडे याचना केली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे राज्याचा चौफेर विकास करीत असताना गेली अनेक वर्षे आमचा प्रश्न खितपत पडलेला असूनही, त्याकडे लक्ष देण्यात ते कमी पडत आहेत. आम्हाला योग्य वेतन, विमा, कर्मचारी भविष्य निधी (पीएफ) या योजना कधी लागू करणार आहेत, याचे उत्तर हवे आहे, असे बालरथ कर्मचाऱयांनी आंदोलनस्थळी सांगितले.
अखिल गोवा बालरथ युनायटेड आणि कामगार संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात कामगार नेत्या स्वाती केरकर, संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र गावडे, सचिव शिवकुमार नाईक, सहसचवि सोनू म्हामल व राज्यातील सर्व शाळांतील बालरथाचे वाहक व चालक उपस्थित होते.
गेली 12 वर्षे चालक व वाहक (सहाय्यक) मिळून सुमारे 844 कर्मचारी प्रामाणिक सेवा बजावत आहेत. चालकाला 11 हजार रुपये तर वाहकाला 5 हजार 500 रुपये इतका तुटपूंजा मोबदला मिळत आहे. आजच्या महागाईच्या कठीण काळात केवळ अकरा हजार रुपयांत या कामकारांनी आपली गुजराण कशी करावी. 12 महिन्याचा पगार देण्याचे सुरवातीला सांगितले असतानाही केवळ दहाच महिन्यांचा पगार दिला जात आहे. त्यामुळे सरकारने आतातरी आमच्या मागण्यांचा गंभीरपणे विचार करावा, असे सचिव शिवकुमार नाईक यांनी सांगितले.
बालरथ कर्मचाऱयांच्या ह्या आहेत प्रमुख मागण्या
1) कदंबच्या चालक व वाहकांना देण्यात येणाऱया सवलतींप्रमाणेच आमचाही व्हावा विचार
2) विमा संरक्षण, पीएफ, पगारी सुटी व इतर सोयी-सुविधा पुरवा
3) वर्षातील बाराही महिन्यांचा पगार मिळावा
4) शाळा व्यवस्थापनाच्या हातात सर्वाधिकार नकोत
5) शिक्षण खात्याने कायमस्वरुपी सेवेत सामावून घ्यावे
मागण्यांवर कोणताच विचार न झाल्याने सरकारने आता 15 दिवसांत बालरथ कर्मचाऱयांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगारांनी व स्वाती केरकर यांनी दिला.
शाळा व्यवस्थापनाकडूनही सतावणूक….
विद्यार्थ्यांचे पालक हे आमच्या विश्वासावर विद्यार्थ्यांना शाळेत सोडतात. आम्हीही आमच्या मुलांप्रमाणेच सर्व विद्यार्थ्यांना घरी पोहचवण्याची जबाबदारी घेतो. पहाटेपासूनच ते दुपारपर्यंत पूर्णवेळ सेवा दिली जाते. रिकाम्या वेळेत शाळा व्यवस्थापनाकडून अन्य कामाला आम्हाला जुंपले जाते. उदाहरणार्थ शिपाई कर्मचाऱयांची अर्धी अधिक कामे आमच्याकडून करवून घेतली जातात. शाळा परिसरातील झाडांना पाणी घालणे आदी कामांसाठीही आम्हाला नेमले जाते. काही बोलल्यास आमचे वेतन रोखण्याची धमकीही शाळा व्यवस्थापनाकडून दिली जाते. आम्हाला देण्यात येणारे तुंटपूंजे वेतनही वेळेत मिळत नसल्याने सरकारने यापुढे आमच्या वेतनाचा व इतर गोष्टींचा निर्णय घेण्याची जबाबदारी स्वतः घ्यावी. शाळा व्यवस्थापनाला अधिकार देऊ नयेत, अशी मागणी बालरथ कर्मचाऱयांनी सरकारकडे केली.









