कचराही हटविला, गटारी तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा होण्यास बनली होती अडचण : रहिवाशांच्या तक्रारीची दखल

प्रतिनिधी /बेळगाव
फोर्ट रोड परिसरातील दुकान गाळ्यांना आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच येथील झाड देखील कोसळण्याच्या मार्गावर होते. मात्र साचलेला कचरा व गटारी तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण झाली होती. याबाबत महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर बुधवारी मनपाकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
फोर्ट रोड परिसरात काही जुन्या दुकानांना आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. झाड देखील जळाल्याने कोणत्याही परिस्थितीत कोसळण्याची शक्यता होती. परिसरात काही दुकान गाळे व इतर व्यावसायिक असल्याने धोका निर्माण झाला होता. त्यामुळे हे झाड हटविण्यात आले आहे. मात्र येथील कचरा व झाडाच्या फांद्या हटविण्यात आल्या नव्हत्या. अशातच गटारीमध्ये कचरा साचल्याने सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला होता. काही व्यावसायिकांनी गटारीवर खोके घातले असल्याने कचरा काढण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या कामगारांनी गटार स्वच्छतेकडे कानाडोळा केला होता. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने कामत गल्ली परिसरात सांडपाणी साचून राहते.
परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे याबाबत येथील व्यावसायिकांनी तसेच कामत गल्लीतील रहिवाशांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. याची दखल घेवून बुधवारी सकाळी गटार स्वच्छता करण्याची मोहीम राबविण्यात आली. तसेच आग लागलेल्या ठिकाणाचा कचरा देखील हटविण्यात आला. गटारीमध्ये प्लास्टिक पिशव्या व कचरा साचल्याने सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी तक्रार करताच स्वच्छता मोहीम राबवून साचलेल्या सांडपाण्याचा निचरा होण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला.
त्यामुळे येथील रहिवाशांनी व व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. काही अनधिकृत खोक्यांमुळे गटार स्वच्छता करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या समस्येवर तोडगा काढून नियमितपणे गटार स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.









