
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव स्पोर्टस् क्लब आयोजित दहाव्या हनुमान चषक 14 वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम साखळी सामन्यात केएलई संघाने ठळकवाडी संघाचा 33 धावांनी पराभव करून गुणाच्या आधारे विजेतेपद पटकाविले. ठळकवाडी संघाला पहिले उपविजेतेपद तर केएलएस संघाला दुसऱ्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सुमीत भोसलेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सीन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात केएलई संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 147 धावा केल्या. त्यात ओम जकातीने 42, सुमीत भोसलेने 41 तर करणने नाबाद 13 धावा केल्या. ठळकवाडीतर्फे श्रीहरी, मयुर व विघ्नेश यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ठळकवाडी संघाने 20 षटकात 8 गडी बाद 114 धावा केल्या. त्यात वेदांतने 25, श्रेयसने 22 तर रुक्मानाने 16 धावा केल्या. केएलईतर्फे सुमीत भोसलेने 3, कलस बेनकेट्टीने 2 तर ओमने एक गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे आनंद चव्हाण, आनंद सोमनाचे, प्रणय शेट्टी, बेळगाव क्लब स्पोर्ट्सचे अध्यक्ष दीपक पवार, संगम पाटील, बाळकृष्ण पाटील, मुख्याध्यापक राजू कुडतरकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या केएलई, पहिले उपविजेते ठळकवाडी, दुसरे उपविजेते केएलएस संघांना चषक देऊन गौरवण्यात आले.









