आयएसआयएस संघटनेच्या संपर्कात असल्यावरून एनआयएची कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
दहशतवादी संघटना आयएसआयएस या संघटनेला देशात घातपात घडविण्यासाठी कट रचणाऱया आणखी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयएने) मंगळवारी ही कारवाई केली आहे. त्यामुळे आयएसआयएस या संघटनेच्या संपर्कात असल्याप्रकरणी अटक झालेल्या आरोपींची संख्या 6 वर पोहोचली आहे.
मजीन अब्दुल रेहमान आणि नदीम अहमद के. ए. अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मजीन हा मंगळूर जिल्हय़ाच्या उळ्ळाल तालुक्यातील तोक्कोट्टू पेर्मन्नूर येथील तर नदीम हा दावणगेरे जिल्हय़ातील होन्नाळीनजीकच्या देवनायकनहळ्ळी येथील रहिवासी आहे. एनआयएने बुधवारी ट्विट करून याविषयी माहिती दिली.
दहशतवादी कृत्यासाठी कट रचल्याच्या आरोपाखाली मंगळूरमधील माज मुनीर अहमद आणि शिमोग्यातील सिद्धेश्वरनगर येथील रहिवासी सय्यद यासीन यांना यापूर्वी शिमोगा पोलिसांनी अटक केली होती. यासंबंधी 19 सप्टेंबर 2022 रोजी शिमोगा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हे प्रकरण 4 नोव्हेंबर 2022 रोजी एनआयएकडे सोपविण्यात आल्यानंतर स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. त्यानंतर दोन स्वतंत्र कारवायांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे.
शिमोगा ग्रामीण पोलिसांत दाखल झालेल्या गुन्हय़ातील प्रमुख आरोपी माज मुनीर याने मजीन अब्दुल रेहमान याला तर सय्यद यासीन याने नदीम के. ए. यांना इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेच्या कारवाया सुरू ठेवण्यासाठी आपल्या गटात सामील करून घेतले होते. मंगळवारी अटक झालेले दोघे संशयित घातपाती कृत्ये घडवून आणण्याच्या अनेक कट रचण्यात गुंतले होते, असे एनआयएने म्हटले आहे.
माज मुनीर आणि सय्यद यासीन यांच्याशी संपर्कात असलेल्या शिमोग्याच्या टिपू सुलताननगर येथील हुझैर फरहान बेग आणि उडुपी जिल्हय़ाच्या बह्मावरजवळील वारंबळ्ळी येथील रिषान ताजुद्दिन शेख यांना एनआयएच्या पथकाने 5 जानेवारी 2023 रोजी अटक केली होती.









