ब्रिटनमध्ये पहिल्याच दिवशी 4 लाख प्रतींची विक्री
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनचे राजपुत्र हॅरी यांची आत्मकथा ‘स्पेयर’ ब्रिटनमध्ये सर्वाधिक वेगाने विकली जाणारे नॉन-फिक्शन पुस्तक ठरले आहे. 10 जानेवारी रोजी प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी याच्या 4 लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. यात मुद्रित पुस्तकासह ई-बुक आणि ऑडिओ बुक देखील सामील आहे. या पुस्तकात ब्रिटनच्या राजघराण्याशी संबंधित अनेक रहस्ये आणि वादांचा उल्लेख आहे.
राजपुत्र हॅरी हे ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचे कनिष्ठ पुत्र आहेत. हॅरी यांनी 2020 मध्ये पत्नी मेगन मर्केलसोबत राजघराण्याच्या सदस्यत्वाचा त्याग केला होता. परंतु आता त्यांनी स्वतःच्या आत्मकथेत बालपणापासून राजघराण्यातून बाहेर पडेपर्यंतच्या अनेक घटनांचा विस्तृत उल्लेख केला आहे.
पुस्तकासाठी लांब रांगा
ब्रिटनच्या राजघराण्याची रहस्ये उघड करणाऱया या पुस्तकातील अनेक हिस्से यापूर्वीच प्रसारमाध्यमांकडून उघड करण्यात आले आहेत. याचमुळे लोक हे पुस्तक वाचण्यासाठी विशेष उत्सुक आहेत. मंगळवारी ब्रिटनच्या बुक स्टोअर्सबाहेर लोकांच्या लांब रांगा दिसून आल्या आहेत. स्पेयर पुस्तकाची किंमत 2,778 रुपये ठेवण्यात आली होती, परंतु बुक स्टोअर्समध्ये हे पुस्तक निम्म्या किमतीत मिळत आहे.

कल्पनेपेक्षा अधिक प्रतिसाद
हे पुस्तक मोठय़ा प्रमाणात विकले जाणार हे आम्हाला माहित होते, परंतु इतक्या विक्रीची आम्ही कल्पना देखील केली नव्हती. पहिल्या दिवशी केवळ हॅरी पॉटरचे पुस्तकच याच्याहून अधिक विकले गेले असल्याचा दावा पुस्तकाचे प्रकाशन पेंग्विन रँडम हाउसचे व्यवस्थापकीय संचालक लॅरी फिनले यांनी केला आहे.
ताजमहालसंबंधी उल्लेख
पत्नी मेगनला ताजमहालसमोर छायाचित्रे काढण्यास मनाई केली होती असे हॅरी यांनी स्पेयरमध्ये नमूद केले आहे. 1992 मध्ये हॅरी यांची आई प्रिन्सेस डायना भारत दौऱयावर आल्या होत्या आणि त्यांनी ताजमहालसमोर छायाचित्रे काढून घेतली होती. त्यांची ही छायाचित्रे अत्यंत प्रसिद्ध ठरली होती. मेगन यांनी अशाप्रकारे छायाचित्रे काढू नयेत असे हॅरी यांचे म्हणणे होते, मेगन ही डायना यांची नक्कल करत असल्याचे लोकांना वाटू शकण्याची भीती त्यांना होती. मेगन या 2017 मध्ये भारतात आल्या होत्या.









