स्वतःच्या प्रांतातच केली कारवाई ः स्फोटांमध्ये 3 ठार
वृत्तसंस्था/ नॅपयीडॉ
म्यानमारच्या लढाऊ विमानांनी बुधवारी कँप व्हिक्टोरियावर बॉम्बवर्षाव केला आहे. हा कँप भारतातील राज्य मिझोरमला लागून आहे. लढाऊ विमानांनी चिन नॅशनल आर्मीच्या (सीएनए) मुख्यालयावर हल्ले केले आहेत. ही संघटना म्यानमारमधील सर्वात शक्तिशाली सशस्त्र संघटना आहे. हवाई हल्ल्यांमध्ये तीन जणांना जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
हवाई हल्ले आंतरराष्ट्रीय सीमेच्या अत्यंत नजीक करण्यात आले आहेत. हे हल्ले मिझोरम-म्यानमार सीमेवर वाहणाऱया तियाउ नदीनजीक झाले आहेत असे चिन नॅशनल आर्मीकडून सांगण्यात ओल. मिझोरममधील खॉबुंग आणि फरकॉन या गावांमध्ये या हल्ल्यानंतर स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत. ही दोन्ही गावे सीमेवर आहेत. स्फोटांमुळे या गावांमधील घरांच्या भिंती हादरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
लढाऊ विमानांनी कँपमध्ये 5 बॉम्ब पाडविले आहेत, चिन नॅशनल आर्मीचे स्थानिक सशस्त्र सदस्य राहत असलेल्या फॅमिली क्वार्ट्सना हवाई हल्ल्याद्वारे लक्ष्य करण्या आले आहे. तर सीएनएला मिळालेल्या इंटेलिजेन्सच्या आधारावर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. आणखी हवाई हल्ले केले जातील असा संघटनेला संशय आहे.
म्यानमारसोबत मिझोरमची 1624 किलोमीटर लांबीची सीमा आहे. काही दिवसांपूर्वी भारताकडून म्यानमार सीमेवरील सुरक्षा वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर हे हवाई हल्ले झाले आहेत. फेब्रुवारी 2021 मध्ये म्यानमारमध्ये सत्तापालट करणाऱया सैन्यावर मानवाधिकार उल्लंघनाचे अनेक आरोप झाले आहेत. सीएनए ही संघटना पीपल्स डिफेन्स फोर्सच्या बॅनर अंतर्गत काम करते. याचे प्रशिक्षण केंद्र मिझोरमपासून अत्यंत नजीक आहे.









