तालुका म. ए. समितीचे धारवाड येथील अधिकाऱ्यांना निवेदन : रिंगरोडमध्ये जाणारी हजारो एकर जमीन वाचविण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
रिंगरोडमुळे शेतकरी भूमीहीन होणार आहेत. त्यामुळे तालुका म. ए. समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याबरोबरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावाही करण्यात येत आहे. मंगळवारी धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रोजेक्ट मॅनेजर यांना हा रिंगरोड रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. रिंगरोडऐवजी फ्लायओव्हर करा, तो फायद्याचा ठरेल, असे या निवेदनात म्हटले आहे.
रिंगरोडमध्ये हजारो एकर जमीन जाणार आहे. त्यामुळे शेतकरी भूमीहीन होणार आहेत. रिंगरोडसाठी करोडो रुपये खर्च केले जाणार आहेत. शेतकऱ्यांना रक्कम द्यावी लागणार, याचबरोबर रस्ता करण्यासाठी मोठा निधी खर्च करावा लागणार आहे. त्यापेक्षा शहराच्या सभोवताली फ्लायओव्हरची उभारणी केल्यास निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. शहराला लागूनच पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यामार्गाला फ्लायओव्हर जोडल्यास जमिनीचे नुकसान होणार नाही. याचबरोबर शेतकरीही भूमीहीन होणार नाहीत. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करा आणि हा रिंगरोड रद्द करा, असे सांगण्यात आले.
यावेळी फ्लायओव्हरबाबत कशाप्रकारे नियोजन करणे गरजेचे आहे, याची संपूर्ण माहिती आणि आराखडाही देण्यात आला आहे. शहरातील वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रिंगरोड करत असल्याचे म्हटले आहे. मात्र यामुळे किती मोठे नुकसान आहे, वाहतुकीवर नियंत्रणच मिळवायचे असेल तर कशाप्रकारे नवीन रस्ते आणि फ्लायओव्हर केले पाहिजेत, याची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे.
रिंगरोड करण्यास देणार नाही
आम्ही कोणत्याही परिस्थितीत रिंगरोड करण्यास देणार नाही, असेही ठणकावून सांगण्यात आले. तुम्ही रिंगरोड करण्यासाठी जर बांधावर आला तर शेतकरी तीव्र विरोध करतील. तेव्हा याबाबत आताच विचार करावा, असे यावेळी सांगण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकारी तसेच केंद्रीयमंत्र्यांना देखील याबाबत माहिती द्यावी, असे सांगण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रोजेक्ट मॅनेजर यशवंत यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर याबाबत वरिष्ठांशी चर्चा करू, तसेच त्यांना ही सर्व माहिती देऊ, असे आश्वासन दिले.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, अॅड. एम. जी. हिरेमठ, अॅड. आर. एम. चौगुले, अॅड. सुधीर चव्हाण, आर. आय. पाटील,
अॅड. शाम पाटील, अॅड. प्रसाद सडेकर, कृष्णा हुंदरे, पुंडलिक पावशे, आंबेवाडी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष चेतन पाटील यांच्यासह तालुका म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.









