नागरिकांना परतावे लागतेय माघारी
प्रतिनिधी /बेळगाव
पोस्ट ऑफिसचे सर्व्हरडाऊन असल्यामुळे सर्वच सेवा ठप्प झाल्या आहेत. सोमवारपासून सर्व्हरडाऊनच्या समस्येमुळे नागरिकांना माघारी फिरावे लागत आहे. यामुळे पोस्ट कार्यालयात मंगळवारी शुकशुकाट पहायला मिळाला. तसेच पैसे काढण्यासाठी अथवा भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांची गैरसोय झाली.
पोस्ट ऑफिसच्या सर्वच कार्यालयांमध्ये सोमवारपासून सर्व्हरडाऊनची समस्या सुरू आहे. यामुळे पत्र व पार्सल पाठविणे या व्यतिरिक्त आर्थिक व्यवहारांशी संबंधित सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. आरडी, बचत खाते यामध्ये पैसे भरण्यासाठी तसेच निवृत्ती वेतन, वृद्धाप वेतनाची रक्कम काढण्यासाठी दररोज गर्दी होते. परंतु सर्व्हरडाऊनच्या समस्येमुळे या सर्वांना माघारी फिरण्याची वेळ येवू लागली आहे.
प्रत्येक गावागावात तसेच शहरांतर्गत पोस्ट ऑफिस असून, या सर्वांना सर्व्हरद्वारे जोडण्यात आले आहे. परंतु सर्व्हरडाऊनच्या समस्येमुळे सर्व व्यवहार ठप्प होत असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याने लवकर दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन…
सर्व्हरडाऊनची समस्या संपूर्ण देशभर सुरू असून, यामुळे अनेक सेवा बंद आहेत. पोस्टाच्या सर्व सेवा पूर्ववत करण्यासाठी तांत्रिक टीम कार्यरत आहे. या दरम्यान नागरिकांनी सहकार्य करावे.
– विजय नरसिंहा (पोस्ट अधीक्षक)









