वृत्तसंस्था/ कौलालंपूर
येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या 2023 च्या बॅडमिंटन हंगामातील पहिल्या मलेशिया खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
1250,000 डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या सुपर 1000 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात चीनच्या हेन युईने भारताच्या सायना नेहवालचा 21-12, 17-21, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव करून पुढील फेरीत स्थान मिळवले. 2022 चा बॅडमिंटन हंगाम सायनाला खूपच अवघड गेला होता. वारंवार दुखापतीची समस्या आणि फॉर्म हरवल्याने ती सूर मिळवण्यासाठी झगडत आहे. मंगळवारच्या सामन्यात पहिला गेम गमविल्यानंतर सायनाने आपल्या स्मॅश फटक्यावर दुसरा गेम जिंकून बरोबरी साधली होती पण तिसऱया आणि शेवटच्या गेममध्ये चीनच्या युईने दर्जेदार खेळ करत सायनाचे आव्हान संपुष्टात आणले. 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सायनाने कास्यपदक मिळवले होते.
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या माजी टॉप सिडेड किदाम्बी श्रीकांतचे आव्हान जपानच्या बिगर मानांकित निशीमोटोकडून पहिल्याच फेरीत समाप्त झाले. जपानच्या केंटा निशीमोटोने केवळ 42 मिनिटांच्या कालावधीत किदाम्बी श्रीकांतचे आव्हान 21-19, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये संपुष्टात आणले. महिलांच्या अन्य एका पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या आकर्षी काश्यपला चीन तैपेईच्या हेसूकडून पराभव पत्करावा लागला. चीन तैपेईच्या वेन हेसूने आकर्षी काश्यपवर 21-10, 21-8 अशी मात करत विजयी सलामी दिली. महिला दुहेरीत त्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सलामीचा सामना हॉगकाँगच्या तिंग आणि लॅम यांच्याशी होणार आहे. त्याचप्रमाणे पुरुष दुहेरीत कृष्णा गर्ग आणि विष्णुवर्धन पांजाला यांचा सलामीचा सामना कोरियाच्या हेयुक आणि जेई यांच्याशी होईल. सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांचा पुरुष दुहेरीतील पहिला सामना कोरियाच्या गेयू आणि वोनशी होणार आहे.









