तुरुंगात मागविली कायद्याची पुस्तके ः
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
श्रद्धा वालकर हिच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या आफताब पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली आहे. दिल्लीच्या साकेत न्यायालयाने मंगळवारी हा निर्णय दिला आहे. यादरम्यान आफताबने कोठडीत वाचण्यासाठी कायद्याच्या काही पुस्तकांची मागणी केली.
पूनावालाला उबदार कपडे उपलब्ध करविण्याचा निर्देश न्यायालयाने सुनावणीदरम्यान तुरुंग अधिकाऱयांना दिला आहे. यापूर्वी 6 जानेवारी रोजी न्यायालयाने आफताबची कोठडी 4 दिवसांसाठी वाढविली होती. श्रद्धा हत्याप्रकरणी आफताबची आतापर्यंत नार्को आणि पॉलीग्राफ टेस्ट झाली असून यात त्याने गुन्हा कबूल केला होता.
एफएसएलच्या टीमने 23 डिसेंबर रोजी आफताबच्या नार्को टेस्टचा अहवाल दिल्ली पोलिसांना सोपविला होता. तसेच न्यायालयाने आफताबची कोठडी 6 जानेवारीपर्यंत वाढविली होती. 15 दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी आफताबला तिहार तुरुंगातून सेंट्रल फॉरेन्सिक लॅबमध्ये नेत आवाजाचा नमुना मिळविला होता. या प्रकरणी तपासादरम्यान पोलिसांना एक ऑडिओ मिळाला असून यात आफताब आणि श्रद्धा यांच्यातील वाद ऐकू येतो. याच ऑडिओतील आवाजाशी आफताबचा आवाज पडताळून पाहिला जाणार आहे. सीबीआयची सीएफएसएल टीम आफताबचा व्हॉइस सँपल आणि ऑडिओ पुराव्याच्या नमुन्याला परस्परांशी जुळवून पाहणार आहे.
तपास पथकाला श्रद्धा-आफताबचा एक कथित व्हिडिओ देखील मिळाला आहे. यात पूनावाला दिसून येतो आणि हा व्हिडिओत मुंबईत तयार करण्यात आला होता. याचमुळे तपास पथक पूनावालाची फेस रिकग्निशन टेस्ट करविण्याच्या तयारीत आहे. या प्रक्रियेदरम्यान पूनावालाचे 3डी फोटो काढले जाणार आहेत.









