बेळगाव : म्हादई प्रकल्पाबाबत केंद्रीय पर्यावरण व वन विभागाकडून विविध घटकासंदर्भात स्पष्टीकरणाची माहिती मागविण्यात आली आहे. तसेच अतिसंवेदनशील क्षेत्र असल्यामुळे मार्गदर्शक सूचना पाळण्याचे निर्देश दिले असून म्हादई प्रकल्पाचे स्वप्न पाहणाऱ्या कर्नाटकला यामुळे मोठा धक्का बसला आहे.
म्हादई प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (डीपीआर ) देण्याच्या सूचना केंद्र सरकारने यापूर्वीच दिल्या असल्या तरी या महत्वाकांक्षी प्रकल्पात पुन्हा अडथळे येत आहेत. वनक्षेत्रात विजेचे खांब वापरू नयेत, त्याऐवजी जमिनीच्या आतच वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच प्रकल्पासाठी वापरलेले वनक्षेत्र नष्ट करू नये, वन मंत्रालयाकडून झाडे तोडण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक इशारा दिला आहे.
प्रकल्पातील हे क्षेत्र अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते. प्रकल्पामुळे प्राण्यांना कोणतीही हानी पोहोचणार नाही असे प्रमाणपत्र प्रदान करणे आवश्यक आहे.
म्हादई प्रकल्पाच्या डीपीआरला सहमती दर्शविल्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले होते. मात्र, केंद्रीय पर्यावरण व वन विभागाने म्हादई प्रकल्पाबाबत खुलासा मागितला असून कर्नाटक सरकारला हा धक्का मानला जात आहे.