माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा इशारा : ‘ईएचएन’ कायद्यानुसार घर क्रमांकासाठी अर्ज, राज्यातील 30 हजारांवर घरे पाडावी लागतील
प्रतिनिधी /मडगाव
दवर्ली-नेहरूनगर येथील रहिवाशांना घर क्रमांक देऊन ती घरे कायदेशीर करण्याची मागणी आम्ही करत नाही, तर सरकारने बेकायदेशीर घरांसाठी मंजूर केलेल्या ‘ईएचएन’ कायद्यानुसार हे घर क्रमांक देण्यासाठी अर्ज केले आहेत. या कायद्यानुसार राज्यभर कित्येक बेकायदेशीर घरांना ‘ईएचएन’ क्रमांक देण्यात आले आहेत. अशी घरे पाडण्याची भाषा कोणी बोलत असल्यास राज्यभरातील 30 हजारांहून अधिक घरे पाडावी लागतील. दवर्ली येथील कमकुवत घटकातील या रहिवाशांवर कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास आपण ती घरे वाचविण्यासाठी सर्वांत पुढे उभा राहीन, असा इशारा भाजप नेते व माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी दिला आहे.
सोमवारी सायंकाळी आपल्या पाजीफोंड, मडगाव येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काही जण आपण बेकायदा घरांना कायदेशीर करण्याचे प्रयत्न करत असल्याचे आरोप करत आहे. आपण बेकायदेशीर घरांना ‘ईएचएन’च्या अंतर्गत फक्त क्रमांक देण्याची मागणी केली आहे. कारण हा कायदा विधानसभेत 40 आमदारांच्या संमतीने मंजूर झाला होता व यात विश्वजित राणे, प्रतापसिंह राणे, सध्याचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांची संमती मिळाली होती. आपण पेडणे मतदारसंघांतील सुमारे 2 हजार घरांना मंजुरी मिळवून दिलेली आहे व राज्यभरातील जवळपास 30 हजार तरी घरांना या कायद्यानुसार घर क्रमांक मिळालेला आहे, असा दावा आजगावकर यांनी केला. फक्त दवर्लीतील घरांना या कायद्याच्या अंतर्गत क्रमांक देण्यास का चालढकल होत आहे, असा सवाल त्यांनी केला.
अन्य ठिकाणची बेकायदेशीर घरे पाडणार काय ?
राज्यात कित्येक ठिकाणी बेकायदेशीर घरांच्या वसाहती वा झोपडपट्टय़ा आहेत. त्यात मडगावातच नजर मारल्यास मोती डोंगर, फकीरबांद, तळेबांद, सदुबांद, आझादनगरी यांचा समावेश आहे. झुआरीनगर, म्हापसा-कासरवाडा येथे मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर घरे आहेत. ती पाडली जाणार काय, असा सवाल आजगावकर यांनी केला.
जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीत आमदार उल्हास तयेकर यांनी परेश नाईक यांचा प्रचार करण्यासाठी आपणास आमंत्रित केले असता आपण पक्षाध्यक्ष सदानंद तानावडे अथवा मुख्यमंत्र्यांनी सांगितले, तरच प्रचारात उतरेन असे स्पष्ट केले होते. नंतर तानावडे यांनी विनंती केल्याने आपण या निवडणुकीत प्रचार केला असता नेहरूनगर येथील रहिवाशांपैकी काही महिलांनी आमच्या घरांना घर क्रमांक नसून तो मिळाल्यास आम्ही भाजपाला मतदान करू, असे सांगितले होते. आमचा उमेदवार विजयी झाल्यावर घर क्रमांक देण्यासाठी प्रयत्न करताना दवर्ली पंचायतीमध्ये सुमारे 160 जणांनी अर्ज केले होते, असे त्यांनी नजरेस आणून दिले.
कायदेशीर बाबी नजरेस आणल्या होत्या
‘ईएचएन’ कायद्यात अशी तरतूद आहे की, पंचायत मंडळ मंजुरी देत नसल्यास पंचायत संचालकाकडे दाद मागून नंतर संचालक पंचायतीच्या सचिवांना घर क्रमांक देण्याचे आदेश देऊ शकतात. या कायदेशीर बाबी मी दवर्ली पंचायतीच्या सरपंचांच्या नजरेस आणून दिल्या होत्या. यात धमकी देण्याचा प्रकार कुठे आला. सरपंचांना घर क्रमांक देण्याचे अधिकार राहत नसताना अशा व्यक्तीला मी का धमकावू, असे आजगावकर म्हणाले. मात्र ‘आरजी’ व अन्य कोणी जे धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत ते जर उगाच सदर रहिवाशांना त्रास करू लागले, तर त्यांच्याशी दोन हात करून हाकलून लावण्यास मागेपुढे पाहिले जाणार नाही, असा सज्जड इशारा आजगावकर यांनी दिला.
‘बाबू कोण म्हणून विचारणारा कोण हा बार्बोझा ?’
भाजपाच्या एसटी विभागाशी संबंधित अँथनी बार्बोझा यांनी आजगावकर यांच्यावर सदर प्रकरणी टीका करताना बाबू आजगावकर कोण असे म्हटले होते. यावर बाबू भडकले असल्याचे दिसून आले. बाबू कोण म्हणून विचारणारा कोण हा बार्बोझा. मी तळागाळातला कार्यकर्ता असून नेहमीच कमकुवत घटकांसाठी लढा देऊन आलेलो आहे. गांधी मार्केटमध्ये एसटी समाजाला फळ-भाजी विक्रीसाठी जागा मी मिळवून दिली. 20 कलमी कार्यक्रमाच्या अंतर्गत गरीबांना घरे मिळवून दिले. मी केलेल्या समाजकार्याचा पाढाच मी वाचू शकतो. या कामांमुळे मला लोकांनी आमदार, मंत्री ते उपमुख्यमंत्री बनविले. असे असताना हा काल-परवाचा पोरगा बाबू कोण म्हणून विचारतो, असे आजगावकर संतापून म्हणाले. यावेळी गांधी मार्केटमधील एसटी समाजातील महिला फळ-भाजी विक्रेत्या उपस्थित होत्या. त्यांनी बार्बोझा यांची अशी बाबूविरोधी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले. बार्बोझा आमचे नेते नसून बाबू आमच्यासाठी सर्वेसर्वा आहेत. त्यांनी गांधी मार्केटमध्ये जागा उपलब्ध केल्याने मागील कित्येक वर्षे आम्ही आमची उपजीविका चालवू शकलो आहोत, असे त्यांनी सांगितले.









