शंकर बाबा पापळकर यांची मागणी
प्रतिनिधी /पणजी
महाराष्ट्रातून अमरावती येथील वज्जर बेवारस दिव्यांग मुलांच्या अनाथालयाचे संचालक व दिव्यांग बेवारस मुलांचा बाप शंकर बाबा पापळकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्यांच्या आल्तिनो पणजी येथील महालक्ष्मी निवासस्थानी वज्जर दिव्यांग पुनर्वसन मॉडेल सादर करून तसा कायदा करावा अशी मागणी केली. त्यांच्यासोबत माय होम इंडिया संस्थेचे अभय थिटे, गोव्याचे माहिती आयुक्त संजय ढवळीकर व अनाम प्रेम संस्थेचे प्रशांत भाट उपस्थित होते. गोवा राज्याचे विकलांग विषयाचे आयुक्त गुरू पावसकर यांना वज्जर येथे पाठवून त्याचा पाठपुरावा करेन असे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिले.
दिव्यांगांचे पुनर्वसन हे शासनाद्वारे अनुदान देऊन होणार नाही त्यासाठी वज्जर मॉडेल राबविले पाहिजे. या मॉडेलनुसार बेवारस दिव्यांगांचे पालकत्त्व स्वीकारले पाहिजे. रहिवासी दाखला, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र मिळवून देणे गरजेचे आहे. 123 दिव्यांग मुले असून त्यांचे पूर्णपणे स्वावलंबन केले आहे. अनेकांची लग्नदेखील लावून दिली आहेत. देशाला वज्जर मॉडेलची गरज आहे असे मत पापळकर यांनी व्यक्त केले. पणजीत आयोजित करण्यात आलेल्या पर्पल महोत्सवात नुकतीच पापळकर यांनी सहभाग घेतला होता. या महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
देशभरात अनेक मतिमंद मुलांना रस्त्यावर, नदीच्या पात्रात, कचऱयात फेकले जाते. बेवारस दिव्यांगांच्या हक्कासाठी मी गेली कित्येक वर्षे संघर्ष करत आहे. बेवारस दिव्यांगांना शासनाने आजीवन पुनर्वसन करावे. ज्यांचे कोण नाही, त्यांची मायबाप सरकारने जबाबदारी घ्यावी. त्यासाठी कायदा व्हावा आणि त्याची सुरूवात गोव्यातून झाल्यास ती देशातील एक महत्त्वाची घटना ठरेल. याचबरोबर बेवारस मुलांच्या आजीवन पुनर्वसनासाठी कायदा व्हायला हवा आणि दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी वज्जर मॉडेल अवलंबिणे गरजेचे असल्याचे पापळकर यांनी पर्पल महोत्सवात आयोजित केलेल्या चर्चासत्रात सांगितले. या महोत्सवात ‘आमच्यानंतर आमच्या मुलांचे काय’ या चर्चासत्रात विविध दिव्यांग संस्थेच्या प्रतिनिधी सहभाग नोंदविला होता. या चर्चासत्रात अनुभव तसेच प्रत्येक तालुक्यात एक पुनर्वसन केंद्र असण्याचा सूर उमटला. यावेळी पूनम नटराजन, दिशा चॅरिटेबल ट्रस्टच्या संध्या काळोखे, शोभा सचदेव, जमिला हाजिक व शंकरबाबा पापळकर उपस्थित होते.









