तिगडी हरिनाला जलाशयात मिळाला कॉमनकॉर्प
प्रतिनिधी /बेळगाव
मत्स्य खात्याला तब्बल 20 किलोचा मासा हाती लागला आहे. त्यामुळे याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. मत्स्य खात्याकडून मासेमारीदरम्यान बैलहोंगल येथील तिगडी हरिनाला जलाशयात हा मासा सापडला आहे. त्यामुळे या माशाविषयी मत्स्य पालकांमध्ये चर्चा होत आहे. साधारण दीड फूट रुंदी आणि चार फूट लांबीचा हा मासा आहे.
मत्स्य खाते जलाशये, नदी आणि नाल्यांतून मत्स्यपालन करते. विशेषत: कटला, राहू, मृगळ आदी जातींच्या माशांचे उत्पादन होते. मात्र, तिगडी जलाशयात सापडलेला हा मासा कॉमनकॉर्प जातीचा आहे. जलाशयात मासेमारीदरम्यान खात्याच्या कर्मचाऱ्याला हा मासा मिळाला. जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार टनांहून अधिक मत्स्य उत्पादन झाले आहे. अलीकडे मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. शेतात तलावाची निर्मिती करून मत्स्यपालनाला प्रोत्साहन दिले जात आहे.
जलाशये, तलाव भाडेतत्त्वावर घेऊन मत्स्य खात्याकडून मत्स्यपालन केले जाते. पावसाळ्यादरम्यान जलाशये-तलावांतून माशांची पिले सोडली जातात. साधारण सहा महिन्यांनंतर पूर्ण वाढ झालेले मासे बाहेर काढले जातात. यावेळी हा 20 किलोचा मासा हाती लागला आहे. सर्रास एक-दोन किलोचे मासे मिळतात. मात्र, हा पूर्ण वाढ झालेला मोठा मासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात या माशाची चर्चा होत आहे.
कुतूहल…
हिडकल, राकसकोप आणि तिगडी जलाशयात मासेमारी सुरू झाली आहे. दरम्यान, मासेमारीसाठी सोडलेल्या जाळ्यात मोठा मासा सापडला आहे. चुकून इतका मोठा मासा हाती लागतो. कर्मचारी माशाकडे कुतूहलाने पाहत आहेत. शिवाय मत्स्य उत्पादनात वाढ झाली आहे.
सुधीर पी., सहसंचालक, मत्स्य खाते









