अनिल कपूर सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत
चालू वर्षात बॉलिवूडचे दिग्गज कलाकार ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. द नाइट मॅनेजर या वेबसीरिजद्वारे आदित्य रॉय कपूर ओटीटीवर पाऊल ठेवणार आहे. ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. फर्स्ट लुक मोशन पोस्टर सोमवारी प्रदर्शित करण्यात आले आहे. द नाइट मॅनेजरमध्ये आदित्यसोबत अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहे. दोन्ही कलाकारांनी यापूर्वी मलंग चित्रपटात एकत्र काम केले होते.

“जगातील सर्वात धोकादायक आर्म्स डीलरला रोखण्यासाठी केवळ एक अस्त्र-हॉटेलचा नाइट मॅनेजर’’ असे पोस्टरच्या कॅप्शनमध्ये नमूद आहे. संदीप मोदी दिग्दर्शित सीरिजमध्ये शोभिता धुलिपाला, तिलोत्तमा शोम, शाश्वत चटर्जी, रवि बहल, अरिस्ता सिंह मेहता हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत.
ब्रिटिश सीरिजचा रिमेक
‘द नाइट मॅनेजर’ या नावाने प्रसारित ब्रिटिश वेबसीरिजचा हा हिंदी रिमेक असणार आहे. सुजैन बायर दिग्दर्शित मूळ सीरिजमध्ये टॉम हिडल्टन, ह्यू लॉरी, ओलिविया कोलमॅन आणि एलिजाबे देबिकी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. 6 एपिसोड्सची ही सीरिज 2016 मध्ये बीबीसी वनवर प्रसारित झाली होती. या सीरिजला अनेक जागतिक पुरस्कार मिळाले होते.









