सभापती रमेश तवडकर यांचे प्रतिपादन : गोमंतक मराठा समाजाच्या मातृमेळाव्यात मार्गदर्शन
प्रतिनिधी /पणजी
गोमंतक मराठा समाजाला फार मोठा इतिहास आहे. या समाजातील व्यक्तिमत्त्व हे उच्च स्थानावर पोहचले आहेत. उदाहरणच द्यायचे झाल्यास अनेक वर्षे गोव्याचे सक्षम नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व भाऊसाहेब बांदोडकर यांच्या रुपाने लाभले. त्या पाठोपाठ शशिकला काकोडकर, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर ही व्यक्तिमत्व गोमंतक मराठा समाजातीलच आहे. त्यांनी या समाजाची दिशा नेमकी कशी असावी, हे त्यांच्या कार्यातून दाखवून दिले आहे. तरीही समाजात नकारात्मक गोष्टी करणारे काही लोक आहेत आणि ते प्रत्येक समाजात सापडतात. याचे कारण म्हणजे मी मोठा की तू मोठा या गोष्टीत दाखवलेला रस आहे. त्यामुळे हा मी पणा बाळगल्याने समाजाचे कार्य खुंटते याची आठवण ठेवून सर्वांनी मी पणाला थारा देऊ नये, अशा शब्दांत सभापती रमेश तवडकर यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, महिलांना मार्गदर्शन केले.
गोमंतक मराठा समाजाच्या राजाराम पैंगिणकर सभागृहात स्व. शशिकलाताई काकोडकर यांच्या 88व्या जयंतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या ‘मातृमेळावा 2023’ या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी निसर्ग जतनाला जीवन मानणाऱया पद्मश्री प्राप्त तुलसी गौडा, समाजाचे अध्यक्ष आनंद वाघुर्मेकर, उद्योजक यतीन काकोडकर, मंगेश कुंडईकर, श्रीकृष्ण आजगावकर, विनोद जांबावलीकर उपस्थित होते.
सभापती तवडकर म्हणाले, गोव्याची प्रतिमा सांभाळण्याचे काम सर्व समाजाचे आहे. गोव्याची मूळ संस्कृती म्हणजे किनारपटय़ा, फेणी (दारू), धागडधिंगा किंवा मौजमाजा ही नव्हे. जगण्याची परंपरा आणि पूर्वजांनी घालून दिलेले आदर्शवादी जीवनाचा पायंडा सांभाळणे म्हणजेच गोव्याची खरी संस्कृती आहे. आज गोवा म्हणजे फक्त काजू फेणी आणि किनाऱयावरील मजा हा समज बाहेरील लोकांमध्ये आहे, ते पुसण्याचे काम प्रत्येक समाजाने घ्यायला हवे आणि तसे होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
तुलसी गौडा यांनी गोव्यात उपस्थिती लावत निसर्ग जतनाचे कार्याला वाहून घेतलेले जीवन याविषयी माहिती दिली. वर्षाला सुमारे दीड लाख झाडांचे संवर्धन व संगोपन केले जात असल्याचे त्या म्हणाल्या. माझे जीवन आणि मरण हे केवळ आणि केवळ झाडे लावण्यासाठीच झालेले आहे आणि मरेपर्यंत समरसतेने या कार्याला झोकून देणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. लहान वयापासून अंग झाकण्यापुरते कपडे असणाऱया 82 वर्षांच्या तुलसी गौडा यांनी निसर्ग संगोपनासाठी दिलेला मंत्र हा देशासाठी लागू पडतो. गोमंतक मराठा समाजातील कार्यकर्ते आणि उपस्थित महिलांनी त्यांच्या टाळ्याच्या गजरात अभिनंदन केले.
उद्योजक काकोडकर यांनीही समाजाच्या वाटचालीविषयी भाष्य करताना समाजाचे सेवक बनून प्रत्येकाने हातात हात घालून काम करण्याची इच्छा व्यक्त केली. समाजाचे अध्यक्ष वाघुर्मेकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात समाजाच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांना प्रशस्तिपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सुनंदा कळंगुटकर यांनी आभार मानले.
आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढे या : चित्रा क्षीरसागर
महिलांच्या कार्याची आठवण व्हावी आणि त्यांना स्फूर्ती मिळावी, या उद्दीष्टय़ाने गोमंतक मराठा समाजाने मातृमेळाव्यात साहित्यिका चित्रा क्षीरसागर व कालिंदी मांद्रेकर यांचा सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. समाजात मान, प्रतिष्ठा व सन्मान मिळवायचा असेल तर महिलांनी रडत-कुडत न बसता आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे. महिला हीच समाजाची खरी ताकद असून, महिलांनी स्वतः ठरवल्यास अशक्य असे काहीच नाही, अशा शब्दांत चित्रा क्षीरसागर यांनी पुरस्कारानंतर उपस्थितांमध्ये स्फूर्ती निर्माण केली.
पद कोणतेही असो, कामाला झोकून द्या…
काणकोण तालुक्यातून भरघोस निवडून आल्यानंतर मला मंत्रिपद मिळेल, या आशेवर माझे कार्यकर्ते होते. परंतु मला सभापती हे सरकारातील महत्त्वाचे पद मिळूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु पद कोणतेही असो, कामाला झोकून दिल्यास अशक्य काहीच नसते हे मी माझ्या कृतीतून दाखवून दिले. आज काणकोणात मंत्रीपद हवे की सभापतीपद हे सामान्यांनाही विचारल्यास सभापतीपदच हवे, असे सांगतील. याचे कारण म्हणजे तुम्ही कोणत्याही पदावर रहा, तुमच्यात निःस्वार्थपणे काम करण्याची धमक आणि जिद्द असेल तर समाजाचा, जनतेचा विकास होतो, अशा शब्दांत सभापती तवडकर यांनी गोमंतक मराठा समाजाला स्वतःचेच उदाहरण देत चांगल्या कार्यासाठी झटण्याची आवाहन केले.









