पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार
वृत्तसंस्था / काबूल
प्रतिबंधित दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपी आणि पाकिस्तानदरम्यान संघर्ष सुरू आहे. आमची संघटना अजूनही पाकिस्तान सरकारसोबत संघर्षविराम करारासाठी तयार असल्याचे संकेत टीटीपीचा म्होरक्या मुफ्ती नूर वली महसूदने दिले आहेत. अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातच्या (अफगाण-तालिबान) मध्यस्थी अंतर्गत पाकिस्तानसोबत चर्चा केल्याचे महसूदने सांगितले आहे.
संघर्षविरामासाठी आम्ही अजूनही तयार आहोत. धार्मिक विद्वानांनी पूर्वीप्रमाणेच आम्हाला मार्गदर्शन करावे. आम्ही त्यांचा सल्ला ऐकण्यासाठी तयार आहोत असे उद्गार महसूदने काढले आहेत. 4 जानेवारी रोजी टीटीपीच्या सर्वोच्च परिषदेने टीटीपी प्रमुखाच्या भेटवर एक नवा निर्देश जारी केला आहे. प्रमुखासोबतच्या कुठल्याही बैठकीवर टीटीपीने सुरक्षेचे कारण देत बंदी घातली आहे.
टीटीपी आणि पाकिस्तान सरकार यांच्यात जून महिन्यात शस्त्रसंधी झाली होती. परंतु 28 नोव्हेंबर रोजी टीटीपीने एक वक्तव्य जारी करत शस्त्रसंधी मागे घेण्याची घोषणा केली होती. तसेच स्वतःच्या सदस्यांना देशभरात हल्ले करण्याचा आदेश दिला होता. तर दहशतवादी हल्ल्यांमधील वाढ पाहता पाकिस्तान सरकार आणि सैन्यनेतृत्व टीटीपीच्या कारवाया रोखण्यासाठी धोरणांची समीक्षा करत आहे.









