नागरिक योजनेपासून वंचित
प्रतिनिधी/ बेळगाव
सर्वसामान्य जनतेला मुबलक शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी अटल भूजल योजना राबविण्यात आली होती. मात्र या योजनेकडे शासनाचेच दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. या योजनेंतर्गत भूजलाचे व्यवस्थापन करून घरोघरी पाण्याचा पुरवठा करणे असा उद्देश होता. मात्र योजनाच अंमलात आली नसल्याने नागरिकांना पाण्यापासून दूर रहावे लागत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त या योजनेची घोषणा केली होती. मात्र अद्याप ही योजना कागदावरच आहे. त्यामुळे शासनाकडून केवळ योजनांची घोषणा होते. मात्र प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत बहुतांशी योजना येवून पोहोचत नाही. या योजनेला अद्याप मुहूर्त मिळाला नाही का? असा प्रश्नदेखील उपस्थित होवू लागला आहे. भूजलाची कमतरता, प्रदूषण आणि इतर बाबींचा विचार करून पाणी कमी असलेल्या भागात ही योजना राबविण्यात येणार होती. मात्र अद्याप ही योजना रखडलेलीच आहे. या योजनेसाठी तब्बल 600 कोटींचा खर्च अपेक्षित होता. यापैकी 50 टक्के रक्कम केंद्र सरकार आणि उर्वरित रक्कम जागतिक बँकेकडून अदा करण्यात येणार होती. मात्र योजनाच अंमलात आली नसल्याने निधीदेखील थांबला आहे.
ग्रामीण भागातील भूजल पातळी वाढवून पाण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करणे हा उद्देशही या योजनेचा होता. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील पाणी उपलब्ध होणार होते. मात्र ही योजनाच अंमलात आली नसल्याने शेतीला तर सोडा. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध झाले नाही. दरम्यान, ग्रामपंचायत पातळीवर संवादात्मक कार्यक्रम राबवून जागृती करण्यात येणार होती. मात्र याकडेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या योजनेपासून नागरिकांना वंचित रहावे लागले आहे..









