एप्रिलपासून लागू होणार वाढीव दर
प्रतिनिधी /बेळगाव
हेस्कॉमने वीज दरवाढीचा प्रस्ताव विद्युत नियामक मंडळ (केईआरसी)कडे पाठविला आहे. त्यामुळे विद्युत ग्राहकांना वीज दरवाढीचा दणका पुन्हा एकदा बसण्याची चिन्हे आहेत. केईआरसीकडून दर निश्चित केल्यानंतर 1 एप्रिलपासून नवे वीज दर लागू केले जाणार आहेत.
दरवर्षी विद्युत मंडळांकडून दरवाढीचा प्रस्ताव केईआरसीकडे पाठविला जातो. केईआरसीचे अधिकारी याचा सविस्तर अभ्यास करून अंतिम दरवाढ जाहीर करतात. 1 एप्रिलपासून संपूर्ण राज्यात ही दरवाढ लागू करण्यात येते. यावर्षीही हेस्कॉमने दरवाढीसाठीचा प्रस्ताव केईआरसीकडे पाठविला असून, त्याची माहिती वर्तमानपत्रातून देण्यात आली आहे.
हेस्कॉमने अनामत रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यापूर्वी 70 रुपये असणारी अनामत रक्कम 95 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक युनिटमागे दरवाढ करण्याची मागणी असल्याने वीजबिलात वाढ होणार आहे. यामुळे ज्या ग्राहकाचे विद्युत बिल 500 ते 600 रुपये येत होते, त्यामध्ये 100 ते 150 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केवळ घरगुतीच नाही तर व्यावसायिक, औद्योगिक वीजबिलातही वाढ केली जाणार आहे. केईआरसीने अंतिम वीजदर जाहीर केल्यानंतरच बिलातील दरवाढ समजणार आहे.









