मोठा अनर्थ घडण्यापूर्वी सिग्नल सुरू करण्याची मागणी : वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नलची उभारणी करण्यात आली आहे. याकरिता लाखो रुपये खर्च करून ही सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र या सुविधेचा व्यवस्थित उपयोग केला जात नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. गोगटे चौकातील ट्रॅफिक सिग्नलची सुविधा पूर्णपणे कुचकामी बनली असून या ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात आली. या अंतर्गत शहर आणि उपनगरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये
ट्रॅफिक सिग्नल सुविधा बसविण्यात आली आहे. शहरातील वाहनांची संख्या वाढल्याने चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. 4 ते 5 बाजूने येणारे रस्ते चौकांमध्ये मिळत असतात. त्यामुळे सर्वच बाजूंनी ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची चौकात गर्दी होते. अशावेळी भरधाव ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे अपघात घडण्याची शक्यता आहे.
काही चौकात अपघात घडत असल्याने प्रत्येक चौकात ट्रॅफिक सिग्नल बसविण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करून ट्रॅफिक सिग्नल बसविण्यात आले होते. मात्र यापैकी गोगटे चौक आणि आरटीओ चौकातील ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्यात आले आहेत. सदर चौकांतून वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत असते. विशेषत: गोगटे चौकातील रहदारी खूपच धोकादायक आहे. उ•ाणपुलावरून येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असतो.
ट्रॅफिक सिग्नल बंद असल्यामुळेच अपघातांच्या घटना
येथील ट्रॅफिक सिग्नल बंद असल्याने ही समस्या निर्माण होत आहे. येथील ट्रॅफिक सिग्नल सुरू करावेत, अशी मागणी सातत्याने केली जाते. मात्र याकडे रहदारी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने कानाडोळा केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणी निर्माण होणाऱ्या वाहतूक केंडीमुळे अपघातांच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे अनर्थ टाळण्यासाठी चौकातील ट्रॅफिक सिग्नल सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
अवजड वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात
रेल्वेस्थानक आणि संचयनी चौकमार्गे काँग्रेस रोडकडे जाणारे वाहनधारक आडवे येतात. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. बऱ्याचदा चौकात वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनधारक अडकून पडतात. खानापूर रोडवरून अवजड वाहनांची ये-जा कायम असते. अलीकडे 12 आणि 16 चाकी वाहने या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. खानापूर, गोवा, रामनगर आणि उद्यमबाग औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गोगटे चौकात नेहमी वाहतूक कोंडी होते. परिणामी वाहनधारकांसमोर समस्या निर्माण होत आहे.









