कुचकामी ठरलेल्या भुयारी मार्गामुळे जेएमएफसी न्यायालयासमोर वाहतूक कोंडी
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन जेएमएफसी न्यायालयाकडे ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात आला. मात्र तो भुयारी मार्ग आता कुचकामी ठरला आहे. न्यायालयाच्या आवारात भुयारी मार्गाचा काही भाग तसाच पडून आहे. त्यामुळे ती जागा वापराविना पडून आहे. पार्किंगची समस्या होत असून आता त्या भुयारी मार्गाचा योग्यप्रकारे नियोजन करून मध्यमार्ग काढणे गरजेचे आहे. अन्यथा नाहक न्यायालयाची जागा अडविली जात आहे.
जिल्हा न्यायालयाकडून जेएमएफसी न्यायालयाकडे वकिलांना ये-जा करण्यासाठी भुयारी मार्गाची बांधणी करण्यात आली. मात्र हा भुयारीमार्ग कुचकामी ठरु लागला आहे. उलट या भुयारी मार्गामध्ये वकिलांचा अधिकवेळ वाया जावू लागल्यामुळे हा भुयारी मार्ग वापराविना तसाच पडून आहे.
1 कोटी 30 लाखाचा खर्च वाया
या भुयारी मार्गासाठी 1 कोटी 30 लाखांहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. ही सर्व रक्कम वाया गेली आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात पार्किंगची समस्या उद्भवत आहे. वाहनांना जागा मिळणेही कठीण झाले आहे. यातच या भुयारी मार्गाचा काही भाग न्यायालयाच्या आवारात आला आहे. त्यामुळे अधिकच अडचण निर्माण होत आहे. जर भुयारी मार्गासाठी बांधण्यात आलेली भिंत तसेच पत्रे हटविले तर किमान पार्किंगसाठी तरी त्याचा वापर होवू शकतो, असे वकिलांचे म्हणणे आहे. तेंव्हा याबाबत जिल्हा प्रशासनाने आणि न्यायालयाने निर्णय घेऊन असलेली अडचण दूर करावी, अशी मागणी होत आहे.









